बँकेकडून मोबाइलवर आलेल्या लघुसंदेशाने मुलुंडला राहणाऱ्या मंदार घाणेकरला घाम फुटला. अंधेरीत नोकरी करणाऱ्या मंदारच्या बँक खात्यातून कुणीतरी एटीएम कार्डचा वापर करून परस्पर पैसे काढले होते. बँकेने या व्यवहाराबाबतचे तपशील लघुसंदेशातून मंदारला कळवले. मंदारने पाकीट काढून डेबिट कार्डसोबत आहे का याची चाचपणी केली. कार्ड पाकिटातच होते हे पाहून मंदारच्या अस्वस्थतेत आणखी भर पडली. त्याने तडक नवघर पोलीस ठाणे गाठले. तेव्हा त्याच्याप्रमाणेच तक्रार घेऊन आलेल्यांचा घोळका आधीपासूनच पोलीस ठाण्यात उपस्थित होता. एकूण ९९ जणांच्या बँक खात्यातून सुमारे ३२ लाख रुपये परस्पर काढण्यात आले होते.

९९ तक्रारदारांकडे केलेल्या चौकशीत एक सामाईक गोष्ट पोलिसांना आढळली. या सर्वानी मुलुंड पूर्वेकडील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम केंद्रातून पैसे काढले होते. त्यावरून स्कीमर यंत्राद्वारे डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचे तपशील चोरून, त्याआधारे बनावट कार्ड तयार करून अज्ञात टोळीने हा घोटाळा केला आहे, हा अंदाज नवघर पोलिसांनी चटकन बांधला. सायबर विभागात केलेल्या कामाचा अनुभव गाठीशी असलेल्या उपायुक्त अखिलेश सिंग यांनी या गुन्ह्य़ाचा तपास हाती घेतला. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माधव मोरे, पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, साहाय्यक निरीक्षक भरत जाधव, संदीप माने, उपनिरीक्षक भूषण पवार आणि पथक कामाला लागले.

निरीक्षक भोसले आणि पथकाने सर्वप्रथम मुलुंड पूर्वेकडील एटीम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलेले चित्रण बँकेकडे मागितले. मात्र केंद्रातला सीसीटीव्ही बंद होता. त्यामुळे एटीएम यंत्रातील कॅमेऱ्याने टिपलेल्या मर्यादित चित्रणातून संशयितांना बाजूला करण्याचे काम पोलिसांवर आले. महिन्याभराचे चित्रण तपासताना दोन परदेशी नागरिक केंद्रात आल्याचे पथकाला आढळले. या दोन परदेशी व्यक्ती गुन्हा घडण्याआधी चार ते पाच वेळा केंद्रात येऊन गेल्या होत्या. मुंबईत स्कीमरद्वारे फसवणुकीचे अनेक गुन्हे घडलेत. त्या गुन्ह्य़ांच्या तपासात रोमानिया, बल्गेरीयातील भामटय़ांचा सहभाग पुढे आल्याने या दोन परदेशी, अनोळखी व्यक्तींवर पोलिसांचा संशय बळावला. चित्रणातून त्यांचे फोटो काढण्यात आले. ते घेऊन निरीक्षक भोसले आणि पथकाने कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठले. अलीकडेच व्ही. बी. नगर पोलिसांनी रोमानियन टोळीला अटक केली होती. दोघांचे फोटो तिथल्या अधिकाऱ्यांना दाखवून विचारपूस सुरू झाली आणि तपासाच्या दृष्टीने पहिला महत्त्वाचा दुवा पथकाच्या हाती लागला. दोन संशयितांपैकी एकाचा फोटो व्ही. बी. नगर पोलिसांनी ओळखला. तो मीयू आयोनेल या रोमानिअन नागरिकाचा होता.

मीयूने अशाचप्रकारे कुल्र्यात गुन्हा केला होता. त्याच्यासोबत मरिअन दुमुत्रु ग्रामा, नडेलसू व्हॅलेन्टीन आयोनेट हे दोन रोमानिअन साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. तोच धागा पकडून नवघर पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. मीयू पूर्वी विरारच्या ग्लोबल सिटी परिसरातील इमारतीत भाडय़ाने वास्तव्यास होता ही माहिती मिळवून पोलीस तेथे धडकले. तेथील चौकशीत अनेक महिन्यांत मीयू तेथे फिरकलेला नव्हता. पण १४ डिसेंबरला तो घाईघाईत ग्लोबल सिटीतल्या भाडय़ाच्या खोलीत आला. तेथून त्याने वीजबिल नेले, अशी माहिती सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली. तो त्याच दिवशी रेल्वेने दिल्लीला गेल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले.

त्याचा मोबाइल १७ डिसेंबरला बंद झाला होता, मात्र तांत्रिक तपासणीत तो सातत्याने मुंबई, ठाण्यातल्या व्यक्तींच्या संपर्कात होता. रोमानिअन मीयू या व्यक्तींच्या संपर्कात कसा, हा प्रश्न पोलिसांना पडला. त्यापैकी एका तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. हा तरुण मीयूला अमली पदार्थ पुरवण्याचे काम करे. घोडबंदरच्या रहिवासी वस्तीत तो मीयूला भेटे. त्यावरून पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील रहिवाशी वस्ती पिंजून काढली. त्यातील एका उच्चभ्रू इमारतीत मीयू भाडय़ाने राहतो, मात्र प्रत्यक्षात हा फ्लॅट गणेश शिंदे नावाच्या व्यक्तीला भाडय़ाने दिल्याची माहिती पुढे आली.पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली तेव्हा चार्जिग करत ठेवलेला लॅपटॉप आणि नव्या कोऱ्या मोबाइलची पेटी अशा दोन वस्तू पोलिसांना आढळल्या. मीयू परतेल या आशेने पोलिसांनी इमारतीबाहेर पाळत ठेवली. तीनेक दिवसांनी गणेश शिंदे तेथे आला. तेथून निसटण्याच्या आत नवघर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गणेश आदल्या दिवशी दिल्लीला जाऊन मीयूला भेटला होता. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी मीयूचा नवा मोबाइल क्रमांक, दिल्लीतील वास्तव्याचे ठिकाण आदी माहिती मिळवली. लगोलग एक पथक दिल्लीला रवानाझाले. त्यांनी मीयूसोबत मरिअन ग्रामाला अटक केली.

चौकशीतून पुढे आलेली माहिती थक्क करणारी होती. मीयू, मरिअन आणि रोमानियातील भामटे टुरिस्ट व्हिसावर भारतात येतात. पर्यटक म्हणून केलेल्या वास्तव्यात ते भारतीय मित्र, साथीदार तयार करतात. या साथीदारांच्या मदतीने मोबाइल म्हणजे संपर्काचे साधन आणि भाडय़ाचे घर म्हणजे निवाऱ्याची व्यवस्था करतात. या प्रकरणात मीयू आणि साथीदारांनी गणेशच्या नावे घर भाडय़ाने घेतले, तसेच शिंदे, पांडुरंग हडकर आणि विरारच्या घरमालकाच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी आपल्या नावे सीमकार्ड घेतली आणि मीयूला पुरवली. रोमानियन टोळीने चीनवरून मोकळी डेबिट कार्डे मुंबईत मागवली होती. हे पार्सल शिंदेच्या नावे मागवण्यात आले होते. शिंदे आर्थिक गुन्ह्य़ांत आर्थररोड कारागृहात बंद होता, तर व्ही. बी. नगर पोलिसांच्या कारवाईत मीयूही कारागृहात होता. तेथेच या दोघांची ओळख झाली. या टोळीने मुलुंड पूर्वेकडील रेल्वे स्थानकाशेजारील वर्दळ असलेले एटीएम केंद्र निवडण्यासाठी आधीपासून पाळत ठेवली होती. त्यातून कोटक महिंद्रा बँकेचे केंद्र निश्चित केले गेले. सुरक्षारक्षक असूनही मीयू आणि त्याच्या दोन फरार साथीदारांनी केंद्रात स्कीमर यंत्र, सूक्ष्म कॅमेरा बसवला. परदेशी नागरिक फक्त फिरायला येतात, ते चोर कसे असू शकतात, हा भाबडा विश्वास आजही मुंबईत कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मीयू आणि त्याच्या रोमानियन साथीदारांना फटक्यात घर भाडय़ाने दिले गेले. त्यांनी या केंद्रात स्कीमर यंत्र लावून तब्बल १६०० ग्राहकांचे तपशील चोरले होते. मात्र १०० जणांचे पैसे गेल्याची तक्रार मिळताच या केंद्रावर व्यवहार केलेल्या सर्व ग्राहकांना बँकांनी आपले पिन क्रमांक बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ग्राहकांची फसवणूक टळली.