देश-विदेशातील पक्षांच्या निवासामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षीप्रेमींचे आकर्षण ठरलेल्या डोंगरी,फुंडे व पाणजे  परिसरात मोठय़ा संख्येने परदेशी पाहुणे असलेल्या फ्लेमिंगोची शिकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसे पुरावेही वन खात्याच्या हाती लागल्याने रायगड विभाग वन संरक्षण विभागाने त्याआधारे गुन्हा दाखल केला आहे.जेएनपीटी बंदरालगत असलेल्या उरण मधील डोंगरी,पाणजे तसेच फुंडे हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने ऑक्टोबर महिन्यापासून फ्लेिमगो तसेच इतर पक्षी येतात. या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी कित्येकदा परदेशी पर्यटकही हजेरी लावतात.
देशातील अनेक ठिकाणाहूनही पक्षी प्रेमी येतात. मात्र काही दिवसांपूर्वी या परिसरातील फ्लेमिंगोचे पंख, चोची, हाडे आदी अवशेष आढळून आल्याने फ्लेिमगोची शिकार होत असल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यानुसार बुधवारी वनसंरक्षण विभागाने प्रत्यक्षात घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असता फ्लेिमगोंचे मृतावशेष आढळून आले आहेत. याप्रकरणी वन विभागाकडून त्याचा तपास केला जात असल्याची माहीती वनाधिकारी मराडे यांनी दिली. या परिसरात असलेल्या रानटी कुत्री तसेच कोल्ह्य़ांकडूनही पक्षी मारले जात असावेत, अशी  शंकाही व्यक्त केली जात आहे.