राज्यात करोना व्हायरसमुळे चौथा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने तिघांचा बळी गेला आहे. मात्र कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या एका मृत्यूमुळे एकूण चार बळी गेले आहेत. २३ मार्चला या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. ही व्यक्ती युएईतून प्रवास करुन भारतात आली होती. या व्यक्तीस उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहही होता अशीही माहिती मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

करोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या १०१ वर पोहचली आहे. आजच पुण्यात तीन आणि साताऱ्यात १ रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ९७ वरुन १०१ वर पोहचली आहे. ही बातमी समोर आलेली असतानाच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भातले पत्रक काढून ही माहिती दिली आहे. सदर व्यक्ती ६५ वर्षे वयाची होती असंही या पत्रकात म्हटलं आहे.