परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत अटक आरोपींकडे देशभरातील ४१ तरुणांची पारपत्रे आणि त्यांच्या नावे रशिया येथील दोन कंपन्यांची बनावट नियुक्तीपत्रे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे अटक आरोपींपैकी तिघांचा शोध कोलकाता पोलीस घेत आहेत. कोलकाता येथेही या टोळीने अशाच प्रकारे अनेक तरुणांची फसवणूक करून पोबारा केला होता.

मालाडच्या एव्हरशाइन मॉलमधील श्री कन्सल्टन्सी नावाच्या कार्यालयात परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक सुरू असल्याची माहिती मिळाली. कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांनी या माहितीची शहानिशा करण्याची सूचना सहकाऱ्यांना केली. शहानिशा करून गावडे यांच्या पथकाने संबंधित कार्यालयात छापा घातला. कार्यालयात एकू ण सहा व्यक्ती उपस्थित होत्या. या सर्वाकडे अशाप्रकारची संस्था चालविण्यासाठी आवश्यक असलेले परवाने, अन्य कागदपत्रे यांची मागणी करण्यात आली. तेव्हा या व्यक्ती निरुत्तर झाल्या. सर्वाना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत आरोपींनी बनावट कागदपत्रांआधारे अनेक तरुणांना फसवल्याचे कबूल केले.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून परदेशातील विशेषत: रशियातील दोन निवडक कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे. नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाकडून ८० हजार ते एक लाख रुपये उकळायचे. तरुणांच्या हाती बनावट व्हिसा, कं पन्यांची बनावट नियुक्तीपत्रे ठेवून पोबारा करायचा, अशी या टोळीची कार्यपद्धत होती. या टोळीने कोलकाता येथे अशाचप्रकारे फसवणूक केल्याची माहिती पुढे आली. या कारवाईत देशभरातील ४१ तरुणांच्या पारपत्राची नक्कल, रशियातील दोन कंपन्यांची बनावट नियुक्तीपत्रे, बनावट व्हीसा आदी कागदपत्रे सापडली.

अब्दुल इस्लाम, शेख मोईनुद्दीन, जयंतकु मार मंडल, तारक मंडल अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.