किनाऱ्यावर येताच प्रवाशांची पांगापांग; तपशील नसल्यामुळे पोलीस संभ्रमात

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला निघालेल्या स्पीड बोटीला अपघात कसा घडला, त्याला कोण जबाबदार, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कुलाबा पोलीस वाचविण्यात आलेल्या २३ प्रवाशांची शोधाशोध करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बचावकार्यानंतर या सर्व व्यक्ती आपापल्या दिशेने निघून गेल्या. त्यांचे तपशील समारंभाच्या आयोजकांकडेही नाहीत. त्यामुळे आता या प्रवाशांना कुठे शोधायचे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

पायाभरणीसाठी निघालेल्या बोटीच्या अपघातात सिद्धेश पवार या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर बोटचालक रुचित साखरकर हा थोडक्यात बचावला. या घटनेला कोण जबाबदार, याचा तपास कुलाबा पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी नेमका घटनाक्रम, प्रवासातील बारीकसारीक तपशील जाणून घेण्यासाठी वाचविण्यात आलेल्यांचे जबाब अत्यावश्यक आहेत.

अपघातानंतर रुग्णालयात दाखल बोटचालक साखरकर याचा एकमात्र जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तो मार्ग खडकाळ आहे याची अजिबात कल्पना नव्हती, असे सांगून त्याने हात वर केल्याचे समजते.

तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुडत्या बोटीतून २३ जणांना वाचवण्यात आले. बचावकार्यासाठी चार बोटी कार्यरत होत्या. वाचविण्यात आलेल्यांना घेऊन या बोटी वेगवेगळ्या वेळी किनाऱ्यावर आल्या. वाचलेले किनाऱ्यावर येताच आपापल्या वाटेने निघून गेले. यातील बहुतांश शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते होते. मात्र त्यांचे तपशील अद्याप मिळालेले नाहीत.

अपघातग्रस्त बोट एमआरएम मरिन्स अशा खासगी कंपनीची असून तिचा मालक अलिबागच्या आवास गावचा रहिवासी आहे. ही बोट मालकाने असीम मोंगिया यांच्या वेस्ट कोस्ट नावाच्या कंपनीकडे भाडय़ाने लावली आहे. ही बोट कंपनीच्या सूचनेनुसार गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा अशी फेरी मारते. बोटचालक साखरकर चार वर्षांपासून कंपनीसोबत आहे, अशी माहिती कुलाबा पोलिसांना मिळाली आहे. या बोटीच्या फेरीसाठी मेरिटाइम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडून परवाना दिला जातो. बोटीच्या वहनयोग्यतेची चाचणी आणि त्याबाबतचे प्रमाणपत्रही याच यंत्रणांकडून दिले जाते. या यंत्रणांनी वेळोवेळी दिलेली प्रमाणपत्रे, चालक साखरकर याचा परवाना, मदतीसाठीची यंत्रणा, समारंभासाठी या बोटीची व्यवस्था करणारे कोण, याची पोलीस माहिती घेत आहेत. अपघातास जबाबदार धरत आमदार विनायक मेटेंसह बोट मालकाविरोधात गुन्हा नोंदवा, अशी मागणी अखिल भारतीय मच्छिमार कृती समितीचे प्रमुख दामोदर तांडेल यांनी शुक्रवारी कुलाबा पोलिसांकडे लेखी तक्रारीद्वारे केली.

पोलिसांना केवळ तासाभरापूर्वी सूचना

धक्कादायक बाब म्हणजे समारंभासाठी एखाद-दोन आमदार, शिवस्मारक प्रकल्पाशी संबंधित अधिकारी नियोजित स्थळी जाणार आहेत, अशी तुटपुंजी माहिती तासाभराआधी कुलाबा पोलिसांना देण्यात आली. या समारंभासाठी मुख्य सचिव, पत्रकार प्रकल्पाच्या ठिकाणी जाणार आहेत याची पुसटशी कल्पना पोलिसांना नव्हती. राजकीय कार्यकर्त्यांबाबत तर कोणतीही सूचना, आदेश पोलिसांना मिळाले नव्हते. आमदार किंवा लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पुढारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, कार्यकर्त्यांचा नेमका आकडा अखेपर्यंत पोलिसांना देण्यात आला नव्हता, अशी माहिती मिळते.