चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या चार महिन्यांतच सरकारी तिजोरीतील अपेक्षित महसुलाला घरघर लागली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राज्याला विविध करांच्या रुपाने ८ हजार ४३१ कोटी रुपये महसूल मिळाला आहे, तर याच कालावधीत २४ हजार ७८८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आवकच पुरेशी नसल्याने खर्चाचे प्रस्ताव प्रलंबित रहात आहेत.
राज्याच्या लेखा व कोषागारे कार्यालयामार्फत जमा व खर्चाचा नियमित अहवाल वित्त विभागाला सादर केला जातो. त्यानुसार एप्रिल, मे, जून व जुलै या आर्थिक वर्षांतील पहिल्या चार महिन्यांची वित्तीय स्थिती खालावल्याचे दिसते. राज्याच्या तिजोरीत अपेक्षित आवक येत नसल्याने खर्चाच्या प्रस्तावांना जड हाताने मंजुरी दिली जात असल्याचे समजते. एक प्रकारे राज्य सरकारला अघोषित दप्तर दिरंगाईचे धोरण अवलंबावे लागत असल्याचे समजते. वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी मात्र राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, असे सांगितले. काही आर्थिक व्यवहार हे थेट रिझव्‍‌र्ह बॅंक व केंद्र सरकारशी होतात, त्यामुळे नियमित जमाखर्चात त्याची नोंद नसते, अशी माहिती त्यांनी दिली. कामे थांबली आहेत किंवा खर्चाशी संबंधित निर्णय घेण्यास विलंब होत आहे, याचा त्यांनी इन्कार केला.

आर्थिक घडी विस्कटली..
* राज्याचा एकूण अर्थसंकल्प २ लाख २ हजार ७०३ कोटी रुपये.
जुलै २०१३(मध्यापर्यंत)
* विविध विभागांना निधी : ९८,८२९ कोटी
* खर्चाचे प्रस्ताव मंजूर : ३३,२५८ कोटी
* प्रत्यक्ष खर्च : १८,५८२ कोटी
* महसूल जमा : ६,९४१ कोटी
ऑगस्ट २०१३ (पहिल्या आठवडय़ापर्यंत)
* विविध विभागांना निधी :
१ लाख ६८४ कोटी
* खर्चाचे प्रस्ताव मंजूर :
४२ हजार ७४ कोटी
* प्रत्यक्ष खर्च : २४ हजार ७८८ कोटी
* महसूल जमा : ८ हजार ४३१ कोटी