X
X

देशाची भावी पिढी ऊर्जासाक्षर!

READ IN APP

भारताला आताआता ऊर्जेचे महत्त्व कळू लागले असले तरी भावी पिढी मात्र सुदैवाने आतापासूनच ‘ऊर्जासाक्षर’ आहे. मुंबईत बुधवारपासून सुरू झालेल्या ‘पश्चिम

भारताला आताआता ऊर्जेचे महत्त्व कळू लागले असले तरी भावी पिढी मात्र सुदैवाने आतापासूनच ‘ऊर्जासाक्षर’ आहे. मुंबईत बुधवारपासून सुरू झालेल्या ‘पश्चिम विभागीय विज्ञान प्रदर्शना’त तरी याचेच प्रतिबिंब उमटले. महाराष्ट्रासह छत्तीसगढ, दीव दमण, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ३४ प्रकल्पांपैकी २०हून अधिक प्रकल्प हे केवळ ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणारे आहेत.
एखाद्या विषयावर इतक्या मोठय़ा संख्येने प्रकल्प सादर होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे, असे वरळीच्या ‘नेहरू विज्ञान केंद्रा’चे क्युरेटर एस. पी. पाठक यांनी सांगितले. २१ डिसेंबपर्यंत हे प्रदर्शन केंद्रामध्ये खुले राहील. वृद्ध आणि अपंगांच्या सोयीसाठी सौरउर्जेवर चालणारा रेल्वेचा स्वयंचलित पूल, सूर्यकिरणांच्या दिशेनुसार हलविता येणारे सौरउर्जेचे पॅनेल, बायो गिझर, जळणासाठी कचरा आणि कोळशापासून तयार केलेल्या पॅलेट्स, ग्रीन पेट्रोल, नाल्याच्या पाण्यापासून वीजनिर्मिती आदी केवळ ‘ऊर्जा’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या प्रकल्पांचा समावेश प्रदर्शनात आहे.
जमीन, हवा, पाणी अशा तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या उर्जेच्या वापराची बचत कशी करता येईल, त्याला पर्याय काय सुचविता येतील याचा विचार विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रकल्पांमधून केला आहे. उदाहरणार्थ समुद्रात तेलामुळे झालेले जलप्रदूषण सौर उर्जेमुळे कसे रोखता येईल, हवेत सौरउर्जेवर चार्ज होणारा ऑटो पायलट, सौरउर्जेवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने वाहन चालकाचा चेहरा, नंबरप्लेट ओळखणे अशा अनेक छोटय़ामोठय़ा कामांसंबंधात ‘ऊर्जे’चा विचार करणारे प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत.
गुजरातच्या एकही प्रकल्पाचा समावेश नाही
या प्रदर्शनात गुजरातमधूनही विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गुजराततर्फे एकही प्रकल्प सहभागी होऊ शकला नाही. गुजरातमधील प्रकल्प निवडीची प्रक्रिया उशीरा सुरू होते. ‘गुजरातचे प्रकल्प वेळेत न आल्याने आम्हाला ते सहभागी करून घेता आले नाहीत,’ असे केंद्राचे क्युरेटर एस. पी. पाठक यांनी सांगितले. गेल्या वर्षीही गुजरातकडून एकही प्रकल्प सादर होऊ शकला नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याची संधी या राज्याने दोनवेळा गमावली.

पंढरपूरचा ‘बायो गिझर’ लक्षणीय
पंढरपूरच्या ‘आपटे उपलप प्रशाले’त सहावीत शिकणाऱ्या क्षितिजा कुलकर्णी हिने तयार केलेला ‘नॅचरल गिझर’ या प्रदर्शनात विशेष लक्षणीय ठरला आहे. आपल्या शेतात शेणखत निर्मितीची प्रक्रिया न्याहाळत असताना तिला ही कल्पना सुचली. त्याला खूप वाफा येत होत्या. म्हणजे खत तयार होताना खूप उर्जा तयार होते, हे तिला कळले. तिने तिथल्या जमिनीत एका बाटलीत पाणी भरून पुरून ठेवले. थोडय़ाच वेळात ते पाणी तापले. यातून तिला बायो गिझरची कल्पना सुचली. जैविक खतनिर्मितीदरम्यान तयार होणाऱ्या प्रचंड उर्जेवर हा गिझर चालतो. पाणी गरम करणे आणि खतनिर्मिती अशी दोन्ही उद्दिष्टे हा गिझर साध्य करतो. एका मोठय़ा पिंपात भाज्यांची देठे, पालापाचोळा आदी जैविक कचरा ठासून भरून मध्येच वाटोळे करून टाकलेला तांब्याचा पाण्याचा पाइप आणि या पाइपला जोडलेला साध्या पाण्याचा पाइप हीच काय ती या गिझरमध्ये करावी लागणारी गुंतवणूक. हे तयार केले की पुढचे काम सूर्याची किरणे करतात. एका मोठय़ा पिंपात जैविक कचरा ठासून भरला की कचरा कुजण्याची प्रक्रिया तब्बल ४५ दिवस चालते. त्या दिवसात अखंडपणे गरम पाणी मिळते, असा क्षितिजाचा दावा आहे. ४५ दिवसांनी खतही तयार होते. ते पिंपाच्या खाली तयार केलेल्या छोटय़ा दारातून उपसता येते. मग वर आणखी कचरा भरायचा. पाण्याची धार वाढवता येत नाही. त्यामुळे, हे पाणी एका थर्माकोल लावलेल्या मोठय़ा पिंपात जमा करायचे. थर्माकोलमुळे या पिंपात पाण्याचे तामपान बराच काळ स्थिर राहते. क्षितिजाने तयार केलेला हा ‘नॅचरल गिझर’ या प्रदर्शनात कौतुकाचा विषय ठरला आहे.

24
X