News Flash

लशीअभावी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी!

गेल्या वर्षी जाऊ न शकलेले तसेच नव्याने जाऊ इच्छिणारे विद्यार्थी यंदा ऑगस्टमध्ये परदेशी शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

|| संदीप आचार्य

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या लाखो मुलांचे भवितव्य त्यांना वेळेत लस न मिळाल्यास अधांतरी राहण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी आपल्या पाल्याचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या हजारो पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

देशातील लस उत्पादन, त्यातून निर्माण झालेला गोंधळ तसेच १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना करोना लस मिळण्यातील अडचणी या पार्श्वभूमीवर परदेशातील विविध विद्यापीठांत आपल्या गुणवत्तेवर प्रवेश मिळालेले लाखो विद्यार्थी वेळेत लस न मिळाल्यास प्रवेशाला मुकतील, अशी भीती आता निर्माण झाली आहे. करोना, टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी खूपच कमी विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकले.

गेल्या वर्षी जाऊ न शकलेले तसेच नव्याने जाऊ इच्छिणारे विद्यार्थी यंदा ऑगस्टमध्ये परदेशी शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे विद्यार्थी तेथे पोहोचणे अपेक्षित असते. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणानुसार अ‍ॅपमध्ये नोंद नसेल तर लसीकरण होणार नाही आणि लशीच्या दोन मात्रा ऑगस्टपूर्वी मिळाल्या नाहीत तर हे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकणार नाहीत. परिणामी विद्यार्थी व त्यांचे पालक अस्वस्थ झाले आहेत. यातील अनेक पालकांनी मुलांसाठी शैक्षणिक कर्जही घेतले आहे. या विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण केले जावे, असे साकडे हजारो पालकांनी पंतप्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना घातले आहे.

महाराष्ट्रातील अनेक मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्राद्वारे लस मिळण्यासाठी विनंती केली आहे. ‘मुंबई ग्राहक पंचायत’चे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती करून या मुलांना जुलैपूर्वी लस देण्याची मागणी केली आहे. भाजपचे खासदार विनय सहस्राबुद्धे व आमदार आशीष शेलार हेही या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:18 am

Web Title: future of students going abroad for higher education without vaccination akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 ‘आरक्षणाच्या मर्यादेवर केंद्राकडून ठाम भूमिकेची अपेक्षा’
2 नेते- अभिनेत्यांकडे रेमडेसिविरचा साठा कसा?
3 ‘स्मशानभूमी परिसरातील प्रदूषण नियंत्रणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करा’
Just Now!
X