५० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तावर 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी, गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दुपारपासून मध्य आणि दक्षिण मुंबईत लाखो भाविक गर्दी करतील. या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली.

लालबागच्या राजासह अनेक प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे आणि लालबाग, चिंचपोकळी, करीरोड, परळ त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते.

पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात १६२ ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. प्रत्येक विसर्जनस्थळ आणि प्रसिद्ध मंडळांच्या मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल. मिरवणूक मार्गावर अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे आणि वस्त्या आहेत. तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती, घटना घडू नये यादृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असेही सिंगे यांनी स्पष्ट केले.

शहरातील अन्य भागांच्या तुलनेत लालबाग, परळ, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी येथे भाविकांची गर्दी होते. तेथे घातपाती कृत्ये घडू नयेत, महिलांची छेडछाड, विनयभंग आदी गुन्हे घडू नयेत, लहान मुलांचे अपहरण किंवा सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरीसारखे गुन्हे घडू नयेत यासाठी व्यूहरचना आखण्यात आल्याचे सिंगे यांनी सांगितले.

१०३ मंडळांविरोधात गुन्हा

डीजेवर न्यायालयाने बंदी घातल्यामुळे मंडळांनी पर्यायी व्यवस्था केली. या पर्यायी व्यवस्थेनेही ध्वनी पातळीबाबतचे नियम मोडले. गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १०३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती सिंगे यांनी दिली. उच्च न्यायालयाने डीजे बंदीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. डीजेचा वापर आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लेझीम, ढोल पथकांना मागणी

डीजेवर बंदी असल्यामुळे आयत्या वेळी मिरवणुकीसाठी पर्यायी व्यवस्था काय करावी, अशा विचारात मंडळे होती. परंतु त्यांनी ढोल पथके आणि लेझीम पथकांचे पर्याय स्वीकारले आहेत. ढोलपथकांसह लेझीम, कच्छी बाजा, बेंजो वाजवणाऱ्या वाद्यपथकांना मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी वाद्य पथकांची संख्या कमी आहे. त्यामुळे काही मंडळांना नकार देण्याशिवाय पर्याय नाही, असे ‘गजर’ ढोल पथकाचे वादक राहुल पतंगे यांनी सांगितले.

५३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

वाहतुकीच्या नियमनासाठी ३,१६१ पोलीस आणि १,५७० ट्रॅफिक वॉर्डन सज्ज असतील. ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.  गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, वांद्रे येथील बडा मस्जिद, जुहू चौपाटी, गणेश घाट (पवई) या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.  १८ रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी आहे. तसेच ९९ ठिकाणी  सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहे. रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंदीचे नियम लागू राहतील.

कसा असेल बंदोबस्त?

  • ५० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तावर
  • फोर्स वन, शीघ्र प्रतिसाद दलातील सशस्त्र कमांडो तैनात
  • राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात
  • पोलिसांच्या मदतीला बॉम्ब शोधक – नाशक पथक, श्वान पथक
  • लालबागच्या राजाचा मिरवणूक मार्ग, गिरगाव चौपाटीवर ड्रोन
  • रोड रोमिओंवर साध्या वेशातील पोलीसांची नजर