गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी घ्याव्या लागणाऱ्या सर्व परवानग्या पुढच्या वर्षीपासून ऑनलाइन घेता येणे शक्य होणार आहे. याचबरोबर परवानगीसाठी एक खिडकी योजनाही अंमलात आणण्यात येणार असल्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत साळवे यांनी सांगितले.
मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी परळ येथील दामोदर सभागृहात गुरुवारी महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचा दुसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात महासंघाने पोलीस अधिकाऱ्यांसमोर गणेशोत्सव काळात मंडळांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. मेळाव्याला महासंघाच्या वतीने गणेशोत्सव काळात संपूर्ण १२ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक चालू ठेवण्याची मागणी, तसेच एक खिडकी योजना किंवा ऑनलाईन परवानगी घेता येईल का? गणेशोत्सव काळात मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल होणारे काही खोटे गुन्हे रद्द करावे अशा प्रकारची मागणी या मेळाव्यात महासंघाने केली होती. यावेळी लोकमान्य टिळकांच्या वंशज मुक्ता टिळक यादेखील उपस्थित होत्या, टिळकांच्या ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच’ या उद्घोषाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य शासनाने या घोषणेसाठी ५ कोटींची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मंडळांनी आपल्या देखाव्यात सामाजिक बांधिलकी बरोबर आपल्या इतिहासाची आठवण जनतेला करुन देणारे देखावे तयार करावे असे यावेळी त्यांनी सांगितले. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात त्यामुळे त्यांच्याकडे सामाजिक संस्था म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या मेळाव्याला पोलीस अधिकारी तसेच आमदार अॅड. आशिष शेलार, माजी आमदार प्रमोद जठार, अशोक हांडे, महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगांवकर, संजय यादवराव, सुरेश सरनोबत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अतिरिक्त पोलीस आयुक्तांचा बहुमोल सल्ला
गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे, मोठे ढोल-ताशे आणून, धांगड-धिंगा करुन गणेशाचे पुजन होत नाही, अशी टिका यावेळी दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी केली. जर मंडळांना खरच काही सामाजिक कार्य करायचे आहे, तर त्यांनी आपल्या मुर्तीचा आणि देखाव्यावरील २५% खर्च कमी करुन देशातील शहीदांच्या कुटुंबियांना आणि शेतकऱ्यांना दिल्यास खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ म्हणता येईल असे दिघावकर म्हणाले. तसेच सर्व मंडळांनी फायर ऑडीट आवश्यक असून, आयसिस आणि इतर दहशतवादी संघटनेचे इतर देशातील वाढते हल्ले पाहता मंडळांनी गाडय़ांच्या पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असेही त्यांनी सांगितले.