मुंबई : रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेले खड्डे आणि त्यातून वाट काढताना वाहन चालकांना करावी लागणारी कसरत, वाहनांमध्ये होणारे बिघाड आणि त्यामुळे दुरुस्तीसाठी येणारा खर्च पाहता पावसाळ्यात चालकांची वाट फार बिकट होते. मात्र गॅरेज आणि सव्‍‌र्हिस सेंटर्सची चलती, असे चित्र आहे. बिघडलेल्या चारचाकी आणि दुचाकी दुरुस्तीसाठी दाखल होण्याचे प्रमाण एप्रिल-मे महिन्याच्या तुलनेत जून-जुलैमध्ये २५ टक्क्य़ांनी वाढले आहे. त्यामुळे वाहन चालक-मालकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

खड्डय़ांमुळे दुचाकी, चार चाकी आणि तीन चाकींच्या हॅण्डलचेही मोठे नुकसान होत असल्याचे चालक-मालक सांगतात. दुचाकींचे तर नटबोल्टही खिळखिळे होत असून त्याच्या दुरुस्तीसाठी सर्विस सेंटर आणि गॅरेजकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात बाफना मोटर्सचे संचालक संदीप कुमार बाफना यांनी दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांचे प्रमाण जून-जुलैमध्ये २५ टक्क्य़ांनी वाढल्याचे सांगितले. टायरला सर्वात मोठा फटका बसतानाच स्टिअरिंगचीही दुरुस्ती करावी लागते. अनेक गाडय़ांमंध्ये या समस्या येत असतात. वाहन चालक किंवा मालकाला नाहक खर्च सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले.

मी गेली २२ वर्षे मुंबई उपनगरांत रिक्षा चालवतो. दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डयांमुळे रिक्षांचे मोठे नुकसान होते. यातून वाट काढताना टायर, मीटर, हॅण्डल इत्यादींचे नुकसान होते.महिन्यातून दोन ते तीन वेळा रिक्षाची दुरुस्ती करावी लागत असून चार हजार रुपयांहून अधिक खर्च होत आहे.

– उत्तम ससाणे, रिक्षा चालक

गेली २० वर्षे टॅक्सी चालवत आहे. पावसाळा आला की खड्डयांची मोठी समस्या आम्हाला सतावते. दुरुस्तीसाठी  पाच हजार रुपये खर्च अधिक मोजावा लागतो.

-संजय सिंग, टॅक्सी चालक