सागरी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय; इर्ला नाल्यावर पहिले जाळे
शहरभरात नद्यानाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी पातमुखावर जाळ्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यातील पहिले जाळे इर्ला नाल्यावर बसवण्यात येत आहे. चार नद्या आणि तीन नाल्यांच्या पातमुखावर येत्या महिनाअखेरपर्यंत जाळ्या बसवण्यात येणार आहेत. प्रवाहासोबत येणारा कचरा या जाळ्यांमध्ये अडकणार असून तो पोकलेन यंत्राद्वारे काढला जाईल.
नद्यानाल्यांवाटे समुद्रात जाणारा कचरा भरतीच्या लाटांसोबत किनाऱ्यावर पुन्हा टाकला जातो. त्यामुळे किनारे साफ करूनही दर दिवशी दोनदा येणाऱ्या भरतीच्या पाण्यातील कचऱ्याने किनारे विद्रूप होतात. किनाऱ्यांचे विद्रूपीकरण आणि पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिकेने नद्या व नाल्यांच्या पातमुखावर जाळ्या (ट्रॅश बूम) बसवण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. सर्वच नद्या, नाल्यांवर या जाळ्या बसवण्याची मागणी होत असली तरी सुरुवातीला चार नद्या व तीन नाल्यांवर या जाळ्या बसवल्या जातील. दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि मिठी या नद्या तसेच मोगरा, इर्ला व लव्हग्रोव्ह या तीन नाल्यांवर या जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका यासाठी एक कोटी १८ लाख रुपये खर्च करणार असून यातील पहिल्या टप्प्यातील जाळ्या शहरात दाखल झाल्या आहेत. यातील पहिली जाळी इर्ला येथील नाल्यावर लावली जात आहे. दोन्ही किनाऱ्यापर्यंत नाल्यांवर पसरणारी ही जाळी दहा दिवसात लावून होईल, अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
नाल्यांवर जाळी लावण्याचा प्रयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे. देशातील इतर शहरांमध्ये अशा प्रकारे जाळ्या लावण्यात आलेल्या नाहीत. मात्र सखल भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांमधील पाणी समुद्रात उपसून टाकणाऱ्या जल उदंचन केंद्रांमध्ये कचरा अडकू नये यासाठी अशा प्रकारच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
या जाळ्यांमधून पोकलेन मशीनच्या साहाय्याने कचरा काढण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र पावसात पाण्याचा प्रवाह वेगाने जात असताना गाळात यंत्र उतरवून कचरा काढण्याचे काम त्रासदायक होण्याची शक्यता आहे. जाळ्यात अडकलेला कचरा काढता आला नाही तरी पाण्याचा प्रवाह अडल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची भीतीही काही अधिकारी खासगीत व्यक्त करत आहेत.