रेशिनगचा आधार दुरावला

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे चटके कचरा वेचणाऱ्या कामगारांनीही बसत आहेत. एकीकडे कचरा वेचण्यावर आणलेली बंदी आणि दुसरीकडे दैनंदिन व्यवहार करताना रोखीच्या अभावी होणारी गरसोय अशा दुहेरी कोंडीत शिवाजीनगर भागातील कचरावेचक कामगार सध्या सापडले आहेत.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी देवनार कचरा भूमीला लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर कामगारांना या भागात कचरा वेचण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कचऱ्यावर उपजीविका असणाऱ्या सुमारे पाचशे ते सहाशे कचरावेचकांना रोजच्या रोटीसाठी झगडा करावा लागत आहे. त्यातच पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद झाल्याने त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. जरी अवैधरित्या कचरा वेचून आणला तरीही माल विकत घेणारे पाचशेच्याच जुना नोटा देत असल्याने या मालाला किंमतच नाही, अशी व्यथा नसरिन शेख या कचरा वेचक महिलेनी मांडली. एका पाचशेच्या नोटेसाठी तीन चार तास रांगेत उभे राहणे परवडत नसल्यामुळे नाईलाजानेइथल्या कामगारांनी आता पाचशेच्या बदल्यात साडेचारशे किंवा चारशे रुपये तर हजाराच्या बदल्यात आठशे रुपये घेऊन दैनंदिन व्यवहार करण्याचा मार्ग पत्करला आहे.

बेताची आíथक परिस्थिती असताना रेशिनगचा मिळणारा आधारही सध्याच्या या चलनकल्लोळामुळे हिरावला आहे. या महिन्याच्या १५ तारखेचे धान्य रेशिनगवर उपलब्ध असून सुद्धा चलन तुटवडय़ामुळे विकत घ्यायला हातात पसे नाहीत, अशा परिस्थितीत येथील कामगार सापडले आहेत. बाजारभावाने धान्य विकत घेणेही परवडणारे नसल्याने आता पुढचे काही दिवस कसे काढायचे असा प्रश्न या कचरावेचकांपुढे निर्माण झाला आहे.

पाण्याचीही भ्रांत

रोजच्या पाणी वापरावर देखील चलन तुटवडय़ाचा परिणाम झाला आहे. मुळात या भागातील बऱ्याच रहिवाशांना पाणी विकत घ्यावे लागते. दोनशे लीटर पाण्याचा बॅरल साठ रुपयांना पडतो. हातात पुरेसे पसे नसल्याने पाणी विकत घेण्यावरही मर्यादा आल्या आहेत. कचरा वेचून आल्यावर आम्हाला आंघोळीसाठीही पुरेसे पाणी नसते. फक्त हात धुवून स्वयंपाक करावा लागतो. लहान मुलांना गेले चार दिवस आंघोळीही नाहीत. उधारीवर तरी किती दिवस पाणी मिळणार, अशी समस्या येथील कचरा वेचक महिला बोलून दाखवतात.