भाज्या महाग; जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईची भीती

मुंबई : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी रात्री आठ वाजता देशभरात २१ दिवसांची संचारबंदी लागू के ल्यानंतर गोंधळ आणि भीतीने मुंबईकरांनी किराणा, एटीएम केंद्रांवरआणि औषधालयात एकच गर्दी के ली. अनेकांनी गरजेपेक्षा अधिक औषधे आणि किराणा खरेदी के ल्याने अनेक औषधालये आणि किराणा दुकाने रिकामी झाली होती. तेल, डाळी, कडधान्ये, तांदूळ, गव्हाचे पीठ, बिस्किटे इतके च नव्हे तर नूडल्स, पास्ता यांसारखी झटपट खाद्यपदार्थाचीही दुकानांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाच्या संचारबंदीची घोषणा करताच अनेकजण रात्री उशिरापर्यंत समान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मंगळवारी दुकानांमध्ये रात्री ११-१२पर्यंत ग्राहकांची गर्दी कायम होती. बुधवारी सकाळीही काही दुकानांबाहेर अशीच गर्दी पहायला मिळत होती. ही गर्दी इतकी होती की काही ठिकाणी पोलिसांना दुकानदारांना समज द्यावी लागली. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढण्याची भीती असल्याने पवईच्या मोरारजी नगर येथील पटेल किराणा दुकानदाराने ग्राहकांना उभे करण्यासाठी दुकानाबाहेर चक्क चौकोन आखले होते.  तीन ते चार फूट लांब आशा अंतराने हे चौकोन आखून ग्राहकांना यामध्ये रांगेत उभे केले. त्यानंतर एक-एक ग्राहकाला दुकानदारांकडून समान दिले जात होते.

जो तो अन्नधान्यासह अन्य वस्तूंची बेगमी करण्यासाठी धडपडत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी ट्वीटरवरून टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमितपणे होणार आहे, त्यामुळे विनाकारण दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन सुरू केले. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधीत व्यक्तींची ने-आण करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हेल्पलाइन सुरू केली.

तरीही नागरिकांमधील संभ्रम, भीती कायम असल्याचे चित्र शहरात सर्वत्र होते. भाजी मंडयांपासून घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीच्या गोदामांवर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. संकेतस्थळांवरही फक्त जीवनावश्यक उत्पादनांचीच विक्री होत आहे. ग्राहकांनी मागणी केलेल्या वस्तू घरपोच पोहोचवण्यासाठी वेळ लागणार असल्याचे संदेश ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्यांनी पाठवले आहेत.

‘माल वाहतुकीच्या गाडय़ा अडकल्यामुळे आधी नोंदवलेल्या वस्तूंचा पुरवठा करण्यास उशीर होत आहे. मागणी नोंदवून घेण्यात येईल मात्र, ती वस्तू नेमकी कधी पोहोचवली जाईल याची आता खात्री देता येणार नाही,’ असे एका संकेतस्थळाच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले.

घरपोच जीवनावश्यक पुरवणाऱ्या कंपन्यांशी पोलिसांची चर्चा

टाळेबंदीत अन्नधान्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरिकांना घरपोच व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी बीग बास्केट, नेचर्स बास्केट, ग्रॉफर्स या आणि अशा अन्य ई कॉमर्स कंपन्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) आणि पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी प्रशासनासोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. या कंपन्यांपर्यंत आणि कंपनीतून ग्राहकांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा होईल, याबाबत विशेष उपाययोजना करण्याची तयारी दर्शविण्यात आली. या कंपन्यांमार्फत वस्तू घरपोच करणाऱ्या व्यक्तींच्या(डिलेव्हरी बॉय) गणवेषाची माहिती बंदोबस्तावरील पोलिसांना कळवून त्यांना रस्त्यात अडवले जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. या कंपन्यांचा व्यवहार सुरळीत सुरू झाल्यास जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल आणि वस्तू वेळेत उपलब्ध होतील, असा दुहेरी हेतू साध्य होईल, असा दावा उपायुक्त अशोक यांनी केला.

करोना ट्रॅफिक हेल्पलाइन

टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक सेवांशी संबंधीत व्यक्तींची ने-आण करणाऱ्या वाहनांना वाहतूक करताना अडथळा निर्माण झाल्यास वेळेत संपर्क साधता यावा यासाठी वाहतूक पोलिसांनी २४९३७७४७, २४९३७७५५ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यास ‘करोना ट्रॅफिक हेल्पलाइन’ असे नाव दिले आहे.

ग्राहकांच्या  साठेबाजीला दुकानदारांकडून आवर

नागरिकांमध्ये इतका संभ्रम होता की अनेकजण वाट्टेल तसा किराणा माल घेत होते. बोरीवलीतील गणेश स्टोर्समध्ये अशा उगीचच साठा करणाऱ्या ग्राहकांना एक किं वा दोन किलो डाळच दिली जात होती. माल येणार आहे.काळजी करू नका, असे दुकानदारांकडून सांगण्यात येत  होते.