मुंबईतील घाटकोपर येथे १६ वर्षांपूर्वी, तर १२ वर्षांपूर्वी अहमदाबादजवळ झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीस गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथक व मुंबई गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई केली. आरोपी शेख याह्या शेख अब्दुल रहेमान हा औरंगाबादचा असून, तो रोशनगेट परिसरातील कौसर कॉलनीतील मीनार मस्जिदजवळ राहणारा आहे. सॉफ्टवेअर अभियंता असलेला याह्या खान हा सिग्मा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी येथे आला होता. त्याच्या मागावर गुजरात दहशतवाद विरोधी पथक व मुंबईच्या गुन्हे शाखेचे पोलीस होते. जवाहरनगर पोलीस ठाण्यात याह्या खान विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांच्या न्यायालयापुढे उभे केले असता त्याला उद्याापर्यंत हस्तांतरित कोठडी सुनावण्यात आली. उद्याा त्याला मुंबईच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईतील घाटकोपर येथे २ डिसेंबर २०१६ रोजी रात्री एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात २ ठार तर ४९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी दत्तात्रय हरिभाऊ शेरकर यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर अहमदाबाद परिसरातील कालूपूर रेल्वेस्टेशन जवळ रेल्वेत २००६ साली बॉम्बस्फोट झाला होता. त्यात शेकडो नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणांमध्ये याह्या शेख अब्दुल रहेमान याचा सहभाग होता, असा त्याच्यावर आरोप आहे. ७ ऑगस्ट रोजी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक एन. एल. देसाई हे त्यांच्या पोलीस पथकासह अहमदाबादेतील रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या स्फोटाचा तपास करीत असताना त्यांना याह्या खान हा मुंबई गुन्हे शाखेला घाटकोपर गुन्ह्यासाठी हवा असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक ब्रह्मभट्ट यांनी या संदर्भातील माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला दिल्यानंतर दोन्ही विभागांच्या पोलिसांचे एक पथक औरंगाबादेत दाखल झाले. आरोपी याह्या याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. या वेळी याह्या याचे वडील अब्दुल रहेमान शेख (वय ७५) हे स्वत: हजर होते. याह्या कोणकोणत्या दहशतवादी संघटनांसाठी काम करतो या बाबत लवकरच माहिती उजेडात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

स्लिपर सेल म्हणून काम

उच्चशिक्षित, उत्तम इंग्रजी बोलणारा तरुण म्हणून याह्याची ओळख होती. अशा तरुणांवर कोणालाही संशय येत नाही म्हणून त्यांना स्लिपर सेलमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते असे तपासात समोर आले. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचा त्या ठिकाणाची रेकी करायची. घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी बॉम्ब ठेवून द्याायचे हे काम या सेलकडे होते. काम झाल्यानंतर हे तरुण परदेशात निघून जात असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकही याह्याच्या मागावर होते.