नवी मुंबई, ठाण्याकडील प्रवास वेगवान; दोन उड्डाणपुल, एक उन्नत मार्ग बांधणार

पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाणे-नाशिक, नवी मुंबई-पनवेल-पुणे किंवा गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूषखबर आहे. या सर्व मार्गाना जोडणाऱ्या घाटकोपर येथील छेडानगर जंक्शनवर होणारी वाहतूक कोंम्डी दूर करणाऱ्यासाठी या ठिकाणी लवकरच दोन उड्डाणपूल आणि एक उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.

सुमारे २०४ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आजच निविदा मागविल्या असून जुलै अखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि पावसाळ्यानंतर कामाला सुरूवात होईल अशी माहिती प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.

छेडानगर पूर्व मुक्त मार्गामुळे दक्षिण मुंबईतून ठाणे, पनवेलच्या दिशेने ये-जा करणाऱ्यांसाठी मोठी सोय झाली आहे. तसेच सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडमुळेही या भागातील वाहतूक सुसाट झाली असली तरी ही सर्व वाहने छेडमनगर जंक्शनवर अडकतात. परिणामी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार या ठिकाणी ५७ .६६ कोटी रूपये खर्चून ६८० मीटर लांबीचा तीन मार्गिकांचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन मार्गिकांचा व १२४० मीटर  लांबीचा आणखी एक उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यांची किंमत ९४.३० कोटी असेल. नवी मुंबईकडून ठाण्याकडे जाणारा हा उड्डाणपूल सध्याच्या छेडानगर उड्डाणपुलावरून पूर्व द्रुतगती महामार्गास जाऊन मिळणार आहे. तसेच छेडानगगर जंक्शन उड्डाणपूल आणि अमर महल जंक्शन उड्डाणपूल यांना जोडणारा ६५० मीटर लांबीचा व दोन मार्गिकांचा आणि ५२.२८ कोटी रूपये खर्चाचा दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.