संदीप आचार्य

करोनाच्या काळात शाळा बंद असताना महाराष्ट्रात आदिवासी विभागाने ज्ञानदानासाठी अभिनव योजना राबविली आहे. थेट मुलांच्या घरी जाऊन शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. एवढेच नव्हे तर बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे हजारो आदिवासी विद्यार्थी आपल्या गावातील, पाडय़ावरील आपल्या छोटय़ा भावंडांनी शिकावे यासाठी मदत करीत आहेत.

महाराष्ट्रात सुमारे ५०० शासकीय आदिवासी आश्रमशाळा,  ५०० अनुदानित आश्रमशाळा, २५ एकलव्य शाळा आणि ४८१ वसतिगृहांतील जवळपास पाच लाख विद्यार्थी या योजनेतून शिक्षण घेत आहेत. करोना टाळेबंदीत शहरी भागात ई-लर्निगचे प्रयोग सुरू झाले, पण राज्याच्या १६ जिल्ह्य़ांतील आदिवासी भागात शाळा सुरू करणे हे आव्हान होते. अनेक भागात विजेचा पत्ता नसल्याने तसेच शाळेत येणे सुरक्षित नसल्याने शिक्षणाचे काय करायचे, हा प्रश्न आदिवासी विभागापुढे होता.  शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक असलेले आदिवासी विभाग विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि काही मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून योजना तयार केली.

‘अनलॉक लर्निग’ या योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या घरी पाठय़पुस्तके पाठविण्याबरोबरच अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनेवर आधारित कार्यपुस्तिका, सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या कृतिपुस्तिका तसेच शैक्षणिक साहित्याचे संच पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे नियोजन करण्यासाठी विषयावार ११ प्रमुख पथके तयार करण्यात आली.

ऑगस्टअखेरीस या अभिनव प्रयोगात आदिवासी विभाग, शिक्षक, ग्रामस्थ व वरिष्ठ विद्यार्थ्यांसह आश्रमशाळेतील आमच्या पाच लाख मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ५५ ते ६० हजार नागरिक सज्ज झालेले असतील, असे डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

गावपातळीवर मदत यंत्रणा

‘‘२५ मुलांमागे एक शिक्षक असे नियोजन आम्ही केले असून घरोघरी जाऊन करोनाबाबतची सर्व काळजी घेऊन आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके घरी पोहोचविण्यात आली आहेत. ४५ टक्के गावांपर्यंत गावपातळीवर आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी मदत यंत्रणा उभी केली आहे. आदिवासी विभागाच्या ४९१ वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या ५४ हजार विद्यार्थ्यांपैकी जे ११ वी ते पदवीचे शिक्षण घेत आहेत, त्यातील काही हजार विद्यार्थी या योजनेत आम्हाला मदत करत आहेत. आदिवासी आश्रमशाळेतील जवळपास साडेचार हजार शिक्षक जमेल तसे करोना व पावसाचा सामना करत आदिवासी गावात व वस्ती-पाडय़ावर जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ज्या गावांमध्ये वीज व अत्याधुनिक यंत्रणा आहे तेथे ई-लर्निगचा वापर केला जात आहे, असे या उपक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.