आग लावली जात असल्याचा पर्यावरणवादी संघटनांचा दावा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गोरेगावमधील आरेच्या जंगलामध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी रात्री उशिरा मॉडर्न बेकरी परिसरात आग लागली होती. महिनाभरात अशी आग पाच ते सहा वेळा लागल्याची माहिती आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी दिली. ‘मुख्यमंत्र्यांनी आरेतील ८०० एकर भाग जंगल म्हणून घोषित केल्यानंतर हे प्रमाण अधिकच वाढले आहे. ही आग निसर्गत: लागत नसून ती अज्ञातांकडून लावली जात आहे,’ असा दावा पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे.

वाढत्या उष्णतेने जंगलांमध्ये आग लागत असते, परंतु मुंबईतील आरेमध्ये मात्र आग लावली जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. आरेमधील विविध ठिकाणी एकामागून एक आगीच्या घटना घडत आहेत. हे कशाचे संकेत आहेत, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित के ला आहे. फेब्रुवारीमध्ये १५ आणि २६ तारखेला अशाच पद्धतीने आग लागली होती. दर आठ ते दहा दिवसांमध्ये हे सत्र घडतेच, असे त्यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी लागलेली आग रात्री स्वयंसेवकांनी विझवली. यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. इथे लागणारी आग विझवण्यात स्वयंसेवकांचे मोठे योगदान आहे. ‘आरेतील ८०० एकरचा भाग जंगल म्हणून घोषित केल्याचे अनेकांच्या पचनी पडलेले नाही. अशा पद्धतीने वारंवार आग लावली जात आहे, जेणेकरून नवीन झाडेही जळून जातील. ही अतिक्रमणाची पूर्वतयारी आहे. याच जागेवर उद्या कब्जा केला जाईल,’ अशी खंत वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन डी यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हा सविस्तर प्रकार पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

‘आरेमध्ये पूर्वी अग्निशमन दलाचे केंद्र होते. नंतर ते हटवण्यात आले. सद्यस्थिती अशी आहे की, आग लागली तर तिचा वणवा होईपर्यंत विझविण्यासाठी कुणीही इथे पोहोचत नाही. आरेसाठी झटणारे स्वयंसेवक जीव धोक्यात घालून आग विझवतात. स्वयंसेवकाची क्षमता असेल तोवर ते नक्कीच प्रयत्न करतील, परंतु चुकून कधी आग वाढल्यास मोठी दुर्घटना घडू शकते,’ असे ‘रिवायडिंग आरे’च्या प्रतिनिधीने सांगितले.

दोन वर्षांपूर्वीच्या घटनेबाबत अद्याप कारवाई नाही

झाडे तोडण्यावर बंधने आहेत. तसे कुणी केलेच तरी गुन्हा दाखल केला जातो. परंतु आग लावण्याबाबत कोणताही नियम नसल्याने हे चित्र दिसत आहे. याचा तपास घेतला तर नक्कीच हे सत्र थांबेल. पण प्रशासनच याबाबत हलगर्जीपणा करत आहे. एका दोघांना अटक केली तर हे प्रकार थांबतील. दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या आगीबाबतही आद्याप कारवाई झालेली नाही, यावरूनच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा अंदाज येतो.

– संजीव वल्सन, रिवायडिंग आरे