मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. तसेच सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने अखेर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
निर्णयाला आव्हान देण्याची शिफारस उच्च न्यायालयात पोलिसांची बाजू मांडणारे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी अहवालाद्वारे राज्याच्या गृहमंत्रालयाला केली होती. रवींद्र पाटीलची साक्ष पूर्णपणे अमान्य कशी काय केली जाऊ शकते, नुरुल्ला याचा मृत्यू अपघातात गाडीखाली चिरडून नव्हे, तर अपघातग्रस्त गाडी क्रेनद्वारे उचलताना पुन्हा पडल्याने त्याखाली सापडून झाला या सलमानच्या दाव्याचा तसेच १३ वर्षांनंतर अशोक सिंगने न्यायालयासमोर येऊन आपण गाडी चालवल्याचा दावा करणे आणि त्याचा आरोप स्वत:च्या माथी घेणे तसेच त्याला नोकरीवरही ठेवणे अनाकलनीय आहे. या सगळ्याचा उच्च न्यायालयाने विचार केलेला नाही. तर तांत्रिक मुद्दय़ांवर अधिक भर देण्यात आल्याचा दावा अपिलात करण्यात आलेला आहे.