नोटबंदीच्या निर्णयावर केंद्र सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हान यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. चलनातून बाद केलेल्या नोटा एकूण चलनाच्या किती टक्केवारीत होत्या. त्याची एकूण संख्या किती होती; तसेच त्यांचे बाजारातील मूल्य किती होते, याची उत्तरे सरकारने श्वेतपत्रिकेत द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद ठरवून त्या ‘लिगल टेंडर’ नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर देशभरात जी काही गोंधळाची परिस्थिती आहे, ती सर्वांनाच माहिती आहे. देशातील नागरिकांना अर्थक्रांती झाल्याचे खोटे स्वप्न अधिक रंजकतेने भासवून दाखवले जात आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. नोटा बाद केल्यानंतर सुरू असलेल्या गोंधळात लोकांना त्यांचे स्वतःचेच पैसे मिळेनासे झाले आहेत. वर्षानुनर्षे कष्ट करून जमवलेले पैसे अचानक रद्द होऊन ते काळ्या पैशांत रुपांतरित होण्यास सरकारचा निर्णय कारणीभूत ठरला आहे, असेही ते म्हणाले. असंघटित कामगार क्षेत्र, कुशल व अकुशल कामगार, किरकोळ व घाऊक विक्रेते यांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. परिणामी एक प्रकारची कृत्रिम टंचाई आणि मंदीला भारतीय बाजारपेठ आणि नागरिक तोंड देत आहेत, असे सांगत या निर्णयावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

आव्हाड म्हणताहेत, सरकारने श्वेतपत्रिकेत या प्रश्नांची उत्तरे द्यावीत!

> आपण ज्या चलनी नोटा बाद ठरवल्या, त्या एकूण चलनाच्या किती टक्केवारीत होत्या? त्यांची एकूण संख्या किती? त्यांचे बाजारातील मूल्य किती होते?

> नोटबंदीच्या निर्णयानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण कोणती पर्यायी व्यवस्था आखलेली होती?

> रद्द करण्यात आलेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे निर्मितीमूल्य किती होते? अशा किती नोटा सरकार नष्ट करणार आहे?

> देशातील खातेदारांना आज बँक मर्यादित रक्कमच देत आहे. मागणी प्रचंड आणि पुरवठा कमी. अशा स्थितीत बँका रिझर्व्ह बँकेकडे किती रकमेची (नोटांची संख्या) मागणी करत आहेत?
रिझर्व्ह बँक देशातील बँकांना त्यांच्या मागणीच्या किती टक्के पुरवठा करत आहेत?

> नव्याने छापण्यात आलेल्या पाचशे आणि दोन हजार किंमतीच्या नोटांचे निर्मितीमूल्य किती आहे? प्रश्नात उल्लेख केलेल्या प्रत्येक नोटेला छापण्यासाठी प्रति नोट किती खर्च येतो
त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.

> बँकांच्या बाहेर लागलेल्या लांबलचक रांगा, लोकांना भेडसावणारी सुट्ट्या पैशांची चणचण यावर आपण जी पर्यायी व्यवस्था आणू पाहत आहात, ती किती दिवसात पूर्ण होईल?