26 October 2020

News Flash

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील

गाडय़ा अपुऱ्या असल्याने दुसऱ्या टप्प्याची सेवा आणखी काही महिने तरी कार्यान्वित होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अक्षय मांडवकर

गाडय़ांच्या कमतरतेमुळे सेवा सुरू होण्यास विलंब

मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेच्या सुरक्षेबाबत ‘लोक लेखा समिती’ने (पीएसी) उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ‘एमएमआरडीए’ने खुलासा केल्यानंतर वडाळा ते सातरस्ता हा रखडलेला मार्ग कार्यान्वित करण्याची परवानगी नगरविकास विभागाने ‘एमएमआरडीए’ प्रशासनाला दिली आहे. मात्र गाडय़ा अपुऱ्या असल्याने दुसऱ्या टप्प्याची सेवा आणखी काही महिने तरी कार्यान्वित होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर स्थानकात मोनोला लागलेल्या आगीनंतर चेंबूर ते वडाळा हा मोनोचा पहिला टप्पा दहा महिने बंद होता. दरम्यानच्या कालावधीत ‘एमएमआरडीए’ने मोनोचे व्यवस्थापन पाहण्यासाठी नेमलेल्या ‘स्कोमी’ या मेलेशियन कंपनीसोबतचे कंत्राट संपुष्टात आले. अखेरीस ‘स्कोमी’च्या गळी पडून प्रशासनाने १ सप्टेंबरपासून पहिल्या टप्प्याची सेवा पुन्हा कार्यान्वित केली. यासाठी स्कोमीला पूर्वीपेक्षा पाचपट अधिक प्रती फेरी दर देण्यात येत आहे. मात्र पुरेशा गाडय़ांअभावी वडाळा ते सातरस्ता या दुसऱ्या टप्प्याची सेवा सुरू करण्यात अडचणी येत आहेत.

या टप्प्याच्या मार्गिकेची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. ‘कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी’ने एप्रिल महिन्यात ही मार्गिका खुली करण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षा परवानगी ‘एमएमआरडीए’ला दिली होती. त्यानंतर ही मार्गिका सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. काही सुरक्षात्मक बाबी आणि ‘पब्लिक अकाउंट्स कमिटी’ने (पीएसी) केलेल्या शिफारशींबाबतचा खुलासा करण्याच्या सूचना नगर विकास विभागाने ‘एमएमआरडीए’ प्रशासनाला केल्या होत्या. या बाबींचा खुलासा एमएमआरडीएने केला. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यावरील सेवा कार्यान्वित करण्यास नगर विकास विभागाने परवानगी दिली आहे, अशी माहिती नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी दिली. अग्निसुरक्षेसारख्या प्राथमिक सुरक्षात्मक बाबींचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरा टप्पा महत्त्वाचा

वडाळा ते सातरस्ता ही सुमारे बारा किलोमीटरची मार्गिका अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या वर्षभरापासून या मार्गिकेवरील स्थानके बांधून तयार आहेत.  मार्गिकेदरम्यान केईएम, टाटा, कस्तुरबा गांधी अशी महत्वाची रुग्णालये आहेत. ही मार्गिका वडाळा, करी रोड, लोअर परेल या रेल्वे स्थानकांना जोडते. अनेक नामांकित शिक्षण संस्था देखील या मार्गिकेच्या जवळपास आहेत. त्यामुळे ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर एमएमआरडीएच्या महसुलात वाढ होणार आहे.

मोनोच्या वडाळा ते सातरस्ता या दुसऱ्या टप्याच्या मार्गिकेवरील सेवा कार्यान्वित करण्यासंदर्भात नगर विकास विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यांनी सुरक्षेसंदर्भात काही सूचना केल्या आहेत.

– संजय खंदारे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:10 am

Web Title: green signal in the second half of mono
Next Stories
1 Navratri 2018 : ‘लोकसत्ता ९९९’ला जोगेश्वरीतून मंगलमय सुरुवात
2 Navratri 2018: एसी’च्या गारव्यात गरब्याचा फेर
3 ऑनलाइन कंपन्यांना बेकायदा खाद्यपदार्थ पुरवणारे अडचणीत
Just Now!
X