गुढीपाडव्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील ५०० कोटींहून अधिकचे व्यवहार ठप्प
ऐन गुढीपाडव्यालाही देशव्यापी सराफा बंद राहिल्याने मुहूर्ताच्या सोने खरेदी व्यवसायाला महाराष्ट्रात ५०० ते ६०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. छोटय़ा सुवर्णकारांपासून मोठय़ा दलाल पेढय़ाही शुक्रवारी बंद राहिल्याने मुहूर्ताचे सोने खरेदी करणाऱ्यांच्या उत्साहावरही यामुळे पाणी फेरले गेले.
चांदी वगळता अन्य धातू व त्यांच्या दागिन्यांवर १ मार्चपासून एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्यात आले आहे. याविरोधात देशभरातील सराफांचा २ मार्चपासून बंद आहे. बंदमुळे देशभरातील सराफ उद्योगाचे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. शहरातील छोटय़ा सराफ पेढय़ा तसेच एकेरी दालने, साखळी दालने चालविणाऱ्या सराफ पेढय़ा बंद होत्या. अनेक ठिकाणी सराफ दुकानांवर मोबाइल क्रमांक ठळकपणे नमूद करण्यात आले होते. बंद असला तरी मोठी मागणी असल्यास ती पूर्ण करण्याची ही सोय असल्याची चर्चा आहे. तसेच बंदमुळे गैरसोय होत असल्याबद्दलची खंत काही सराफ पेढय़ा या त्यांच्या नेहमीच्या ग्राहकांना मोबाइल निरोप पाठवत होत्या. तनिष्क, टीबीझेडसारखी मोठी साखळी सराफ दुकाने मात्र सुरू आहेत. दरम्यान, सरकारने सराफांच्या मागण्या मान्य करून सुवर्णकारांचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन मुंबई सुवर्णकार संघाचे अध्यक्ष सुधीर पेडणेकर यांनी केले आहे.

Untitled-28