मुंबईत पावसाने विश्रांती घेऊनही रेल्वे सेवा सुरळीत न झाल्यामुळे गुरूवारी हार्बर रेल्वेवरील प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. या संतप्त प्रवाशांनी चेंबूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उतरून रेलरोको आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या हार्बर रेल्वेची अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांकडून या प्रवाशांना ट्रॅकवरून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सगळ्यामुळे हार्बर रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबईत मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. काल संध्याकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ही वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. आज सकाळपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक तुरळक अपवाद वगळता सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, तांत्रिक बिघाडाचे विघ्न पाचवीला पुजलेली हार्बर रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे सकाळपासून रखडतच चालत होती. कुर्ला स्थानकात झालेल्या या बिघाडामुळे अनेक ट्रेन कडेच्या ट्रॅकवर उभ्या कराव्या लागल्या. या सगळ्या गोंधळामुळे सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन तब्बल २५ मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशी प्रचंड संतापले आणि त्यांनी रेल रोको आंदोलनाला सुरूवात केली.

गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे उपनगरीय रेल्वेसह एक्स्प्रेसची चांगलीच कोंडी झाली होती. अतिवृष्टीमुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून सुटणाऱ्या एकूण १८ एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले. यापैकी १४ एक्स्प्रेस पूर्णत: रद्द करण्यात आल्या. २ एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आल्या, तर उर्वरित २ एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्या. मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत पश्चिम रेल्वेच्या १२६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले होते.