|| संदीप आचार्य

आरोग्य विभागाच्या अमरावती येथील अतिविशेष उपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या वर्षभरात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध असून आठ यशस्वी शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी केल्या असून आगामी आठवडय़ात आणखी दोन शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात आठ ते १२ लाख रुपये खर्च येतो.

अमरावतीच्या या रुग्णालयात २००८ पासून डायलिसिस सेवा सुरू आहे. येथे येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक मूत्रपिंडदान करण्यास तयार होते. मात्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची व्यवस्था येथे नव्हती. डायलिसिसचे उपचार घेणारे बहुतेक रुग्ण हे सामान्य अथवा गरीब असल्यामुळे मुंबई अथवा शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून मूत्रपिंड प्रत्यारोपणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. सतीश पवार यांनी या संकल्पनेला सर्वार्थाने मदत केली.

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला परवानगी मिळाल्यानंतर तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली. तसेच या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात आली. गेल्या वर्षी ४ एप्रिल २०१८ रोजी पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. नागपूर येथील तज्ज्ञ डॉ. संजय कोलते यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आतापर्यंत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या आठ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले. डॉ. राहुल पोटाडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. विक्रम कोकाटे आदी डॉक्टरांची टीम यासाठी मेहनत घेते. शंभर खाटांच्या या रुग्णालयात ४५ खाटा या मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी राखीव आहेत.

डायलिसीसचे उपचार घेणारे बहुतेक रुग्ण हे सामान्य अथवा गरीब आहेत. येथे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना एक रुपयाही खर्च येत नाही. रुग्णालयात झालेल्या आठ शस्त्रक्रियांचा सर्व खर्च महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.     – डॉ. शामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक