संदीप आचार्य, मुंबई

मानसिक आजारावरील उपचारातून बरे झालेल्या रुग्णांना त्यांचे पुढील आयुष्य स्वतंत्रपणे जगता यावे यासाठी आरोग्य विभागाने अशा रुग्णांसाठी हक्काचे घर योजना तयार केली आहे. आरोग्य विभागाच्या चार मनोरुग्णालयांत उपचारानंतर बरे झालेले २१५ रुग्ण असून त्यांच्यासाठी ‘हाफ वे होम’ संकल्पना राबविण्यात येणार असून नागपूर येथे त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे. तीन स्तरावर ही योजना राबविण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाची ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर येथे चार मनोरुग्णालये असून येथे सुमारे साडेतीन हजार मनोरुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय वर्षांकाठी या मनोरुग्णालयांमध्ये पावणेदोन लाख रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात उपचार करण्यात येतात. नातेवाईकांनी दाखल केलेले रुग्ण बरे झाल्यानंतरही बहुतेक प्रकरणात नातेवाईक आपल्या रुग्णांना घरी घेऊन जाण्यास तयार नसतात. तर अनेक प्रकरणात नातेवाईक अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक खटला दाखल करण्यात आला असून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना नातेवाईक घरी नेण्यास तयार नसले अथवा नातेवाईक सापडत नसल्यास अशा बऱ्या झालेल्या रुग्णांची व्यवस्था सरकारतर्फे कशाप्रकारे केली जाते अशी विचारणा करण्यात आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने मानसिक आजारावरील उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी ‘हाफ वे होम’ योजना तयार केली असून त्याचे सादरीकरण सर्वोच्च न्यायालयात केले आहे. राज्यातील चार मनोरुग्णालयांत  बहुतेक रुग्ण हे कित्येक वर्षांपासून दाखल असून यातील बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी योजना राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी रुग्णालयाच्या आवारातच स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना रस्ता ओलांडण्यासह दैनंदिन व्यावहारातील आवश्यक त्या गोष्टी शिकविल्या जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात समाजकल्याण खात्याची निवारा गृहे, तसेच आश्रमांमध्ये बऱ्या झालेल्या रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार  आहे.

तिसऱ्या टप्प्यात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या बऱ्या झालेल्या रुग्णांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून ठाणे मनोरुग्णालयाशी संलग्न एका सामाजिक संस्थेने रुग्णांची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली असल्याचे डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

होणार काय? 

सध्या संपूर्णपणे बरे झालेले २१५ मनोरुग्ण असून नागपूर मनोरुग्णालयाच्या आवारात काही रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. मानसिक आजाराच्या रुग्णांकडे केवळ समाजच नव्हे तर नातेवाईकही पाठ फिरवतात. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना त्यांचे नातेवाईक घरी नेण्यास तयार होत नाहीत. परिणामी या रुग्णांना बरे होऊनही रुग्णालयातच राहावे लागत आहे. यातूनच बरे झालेल्या मानसिक आजाराच्या रुग्णांना हक्काचे घर देण्याची योजना तयार करण्यात आली असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल, असे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.