राज्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असून, गेल्या २४ तासांत ५,४२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एक-दोन दिवसांत राज्यात काही प्रमाणात निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून सातत्याने फिल्डवर असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी’, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, दिवसभरात राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांना देखील करोनाची लागण झाली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना देखील करोनाची लागण झाली आहे.