शक्ती मिल बलात्कारप्रकरणी न्यायालयात युक्तिवाद

मुंबई : सलगचा बलात्कार हा खुनापेक्षा गंभीर गुन्हा आहे? अशा गुन्ह्य़ासाठी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते का? असा सवाल शक्ती मिल बलात्कारप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या तीन आरोपींच्या वकिलांनी गुरुवारी उच्च न्यायालयात उपस्थित केला. तसेच या आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी शिक्षा ही अत्यंत क्रूर असून त्यामुळे त्यांच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे, असा दावाही त्यांनी केला.

आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना विशेष सत्र न्यायालयाने निर्भया प्रकरणानंतर नव्याने केलेल्या कायद्यानुसार दुसऱ्यांदा बलात्काराच्या गुन्ह्य़ात दोषी ठरल्याने फाशीची शिक्षा सुनावली होती. वृत्तछायाचित्रकार तरुणीवरील बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिन्याच्या अंतराने टेलिफोन ऑपरेटर तरुणीने पुढे येत आपल्यावरही याच आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. खटल्याच्या वेळी मात्र पहिल्यांदा टेलिफोन ऑपरेटरवरील बलात्काराचा निकाल न्यायालयाने सुनावत आरोपींना जन्मठेप सुनावली. पोलिसांनी एक अर्ज करत आरोपींना नव्या कायद्यानुसार शिक्षा सुनावण्याची मागणी केली.  आरोपी सलग दुसऱ्यांदा बलात्काराच्या गुन्ह्य़ात दोषी ठरल्याचे नमूद करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षेसह या कायद्याच्या वैधतेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुनावणीत आरोपींना सुनावण्यात आलेली शिक्षा ही चुकीची आहे. त्यांनी केलेला गुन्हा आणि शिक्षा यात अंतर आहे, असा दावा अ‍ॅड्. युग चौधरी यांनी केला.