राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या मुद्द्यावरून बुधवारी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचा आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुरस्काराविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर राजभवनात पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण प्रदान करण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आव्हाडांनी याबद्दल विरोध दर्शवित सरकारवर टीका केली. ज्यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंची बदनामी केली, इतिहासाचे विकृतीकरण केले त्यांच्या लिखाणाला आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने राजमान्यता मिळणार आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे. महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा सांगत असला तरी सध्या राज्यभरात सनातन्यांची सत्ता असल्यामुळे आम्ही हा निर्णय रोखू शकलो नाही. त्यामुळेच आमच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागितल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
तत्पूर्वी बुधवारी सकाळापासूनच पुरस्कार सोहळ्याला होणारा विरोध लक्षात घेता पोलीसांनी राज्याच्या अनेक भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांनी सकाळापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये आव्हाड सुरूवातीपासूनच आघाडीवर  होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी लालबाग आणि भारतमाता येथे शरद पवारांविरोधात निदर्शने केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पवारांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. दरम्यान या घटनेनंतर पोलीसांनी आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल पत्रकारपरिषद घेत बाबासाहेबांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे समर्थन केले होते. तसेच जातीयवादी राजकारणाच्या मुद्द्यावरून पवारांवर जोरदार टीका केली होती.

मुंबई पोलिसांची आज कसोटी

दरम्यान, आज राज्याच्या इतर भागातही या पुरस्कारावरून निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांत या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना  ऊत आला असल्यामुळे आज राजभवनात कडेकोट बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पडणार आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात कोणतीही गडबड होऊ नये म्हणून राजभवनात हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण ‘ देऊ नये यासाठी जितेंद्र आव्हाडांनी मंगळवारी राज्यपालांची भेटही घेतली होती.