लोणावळा, कसारा, इगतपुरी घाट क्षेत्रात २१ दरड दुर्घटना; रूळ पाण्याखाली; कोकण रेल्वे विस्कळीत
मुंबई : राज्यातील अनेक भागांत बुधवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने मेल-एक्स्प्रेस प्रवाशांची मोठी कोंडी के ली. पावसाचा फटका कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते इगतपुरी घाट क्षेत्राला बसला. तब्बल २१ ठिकाणी दरड कोसळण्यासह विविध घटनांमुळे या मार्गावरील मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक गुरुवारी कोलमडले. अशीच कोंडी कोकण रेल्वे मार्गावरही झाली.

चिपळूण ते कामाठे दरम्यान पूरस्थिती निर्माण झाल्याने कोकण रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या व मुंबईतून राज्यात व त्याबाहेर जाणाऱ्या अनेक गाड्या अडकल्या. काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर १०० हून अधिक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

मध्य रेल्वेवर कर्जत ते लोणावळा घाट क्षेत्रात १७ ठिकाणी दरड कोसळणे, झाड पडणे, चिखल, माती रुळावर येणे, रुळाखालील खडी वाहून जाणे, सिग्नल खांब पडणे आणि ओव्हरहेड वायर तुटण्याच्या घटना घडल्या. अशीच परिस्थिती कसारा ते इगतपुरी दरम्यान चार ठिकाणी होती.

मोठे दगड रुळांवर आले तसेच मोठ्या प्रमाणात रुळांखालील मातीही वाहून गेल्याने या दोन्ही मार्गांवरील  परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे नाशिक, पुणे मार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रकाला कोलमडले.

सीएसएमटीबरोबरच, एलटीटी, ठाणे, कल्याण, बदलापूर, इगतपुरी, कसारा,कर्जत स्थानकात एक्स्प्रेस गाड्या टप्प्याटप्यात उभ्या होत्या. नाशिक, पुणे येथून येणाऱ्या गाड्याही त्या त्या भागांतील स्थानकांत अडकल्या.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे व नाशिक इगतपुरी येथून एसटीच्या १३३ जादा बसेस सोडण्यात आल्या. यातून ५ हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.

मुंबईच्या प्रवाशांना फटका

मुंबईतून रात्री प्रवासाला निघालेले प्रवासी हे कसारा, बदलापूर, कर्जतपर्यंतच प्रवास करू शकले. तब्बल बारा तासांपेक्षा अधिक वेळ या पट्ट्यातच ट्रेन अकडल्याने पुढपर्यंत प्रवास करणार कसा असा प्रशद्ब्रा प्रवाशांना पडला. गाडी रद्द झाल्याची माहिती आयत्या वेळी मिळाल्याने कु टुंब व सामानासह स्थानकात आलेल्या प्रवाशांना पुन्हा माघारीही फिरावे लागले. त्यामुळे टर्मिनस, स्थानकात काहीशी गोंधळाचीच परिस्थिती होती.

मार्ग बदलले

कोंडी टाळण्यासाठी व पुढील प्रवास होण्यासाठी मुंबईतून बनारस, अमृतसर, गोरखपूर, पाटलीपुत्र, पुरी या उत्तर भारतात जाणाऱ्या काही गाड्या ठाणे, वसई रोड, नंदुरबार, जळगाव मार्गे वळवण्यात आल्या. उत्तर भारतातूनही मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या याच मार्गाने हळूहळू येत होत्या. परंतु पर्यायी मार्गाने यावे लागत असल्याने प्रवाशांचा प्रवास बराच लांबला. गोंदिया, नागपूर, सिकं दराबाद, अमरावती येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या मनमाड, भुसाळवपर्यंतच चालवून पुन्हा त्या अमरावती, नागपूरसाठी रवाना करण्यात आल्या. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी निघालेले अनेक प्रवासी मधील स्थानकांवर अडकले.

दादर, सीएसएमटी येथून अमरावती, साईनगर शिर्डीसाठी सुटलेल्या गाड्याही फक्त कल्याणपर्यंतच चालवल्या. मुंबई ते पुणे ते मुंबई मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसह अन्य विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.

कोट्यवधी रुपयांचे नुकसान

घाट क्षेत्रात पाणी भरणे, रुळाखालील माती वाहून जाणे, भूस्खलन, कडे कोसळणे, नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहणे इत्यादीमुळे सुमारे २१ ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते. याशिवाय बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, कर्जत, खोपोली, उंबरमाळी वाशिंद या ठिकाणीही पाणी साचले व रुळाखालील खडी वाहून गेल्याने लोकल व मेल-एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसला. त्यामुळे सुमारे ४,३०० घनमीटर रुळाखालील माती वाहून गेली. तर सुमारे १,९०० घनमीटर एवढे भूस्खलन व दरडी कोसळल्या. विविध ठिकाणी एकूण ९५० कामगार, सुपरवायझर ७५ आणि अधिकारी काम करत होते. यात रुळांचे, ओव्हरहेड वायर, सिग्नलसह अन्य नुकसान झाले. हे नुकसान कोटींचे असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. कसारा येथे बुधवारी मध्यरात्री अवघ्या चार तासांत झालेला १३६ मिमी पाऊस आणि कर्जतमध्ये एका तासामध्ये (मध्यरात्री १.०० ते २.०० वाजेपर्यंत) झालेला ८६.६ मिमी पाऊस यावरून मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाच्या तीव्रतेचा अंदाज घेतला जाऊ शकतो. गुरुवारी सकाळपर्यंत कर्जत येथे १५७.७ मिमी आणि लोणावळ्यात १७८ मिमी पावसाची नोंद झाली होती.