News Flash

वादळामुळे मुंबईकरांची दैना

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जोराचे वारे वाहू लागले होते.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळेवृक्षांची पडझड, वाहने, मालमत्तेचे नुकसान; मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत

मुंबई : अरबी समुद्रातून घोंघावत गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने सोमवारी मुंबईची पुरती दैना उडविली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. कुलाबा परिसरात दुपारी ताशी १२० किमी वेगाने वारे वाहात होते. कधी नव्हे तो दक्षिण मुंबईमधील कुलाबा, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, गिरगाव परिसर जलमय झाला, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील भागांत पाणी साचले. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक भागांत दुपारी ४.३० वाजेपर्यंत १५० मिमीहून अधिक पाऊस पडला. उन्मळून पडलेल्या वृक्षांमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झोपड्यांवरील छप्पर उडून गेले, तर काही ठिकाणच्या संरक्षक भिंती कोसळून नुकसान झाले.

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जोराचे वारे वाहू लागले होते. सोमवारी पहाटेपासून वादळाने उग्र रूप धारण केले. वाऱ्यांचा वेग वाढला तसे मुसळधार पावसानेही झोडपण्यास सुरुवात केली. कधी नव्हे ते दक्षिण मुंबईमधील कुलाबा, नरिमन पॉइंट, गिरगाव आदी भागांमध्ये पाणी साचले. वाऱ्याचा वेग आणि पावसाचा तडाखा वाढतच होता. बरसणाऱ्या जलधारा आणि वाऱ्याचा मारा सहन न झाल्यामुळे मुंबईतील ठिकठिकाणचे मोठाले वृक्ष उन्मळून पडू लागले, तर काही वृक्षांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या. वाहतुकीत अडथळा बनलेले वृक्ष हटविण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

करोना संसर्गामुळे सध्या मुंबईमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. रेल्वे प्रवासास परवानगी नसल्यामुळे खासगी कंपन्यांतील बहुतांश कर्मचारी घरूनच कार्यालयीन काम करीत आहेत. परिणामी, चक्रीवादळामुळे सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना बहुतांश मुंबईकर घरातच होते

चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले होते. गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर आदी ठिकाणच्या चौपाट्यांवर रौद्ररूपी लाटा धडकत होत्या. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर काही चौपाट्यांवर एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली होती.

पाणी तुंबलेली ठिकाणे

महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक, वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय (शीव), बिंदुमाधव जंक्शन (वरळी), पठ्ठे बापूराव मार्ग (ग्रॅन्ट रोड), चंदन स्ट्रीट (मस्जिद बंदर रोड), चिराबाजार, शंकर बारी लेन, मोदी स्ट्रीट (कु लाबा), जे. जे. रोड जंक्शन, बीडीडी चाळ, अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सब-वे, ओशिवरा बस आगार, साईनाथ सब-वे, लोखंडवाला लेन (अंधेरी), मालवणी प्रवेशद्वार क्रमांक ६, योगीनगर (बोरिवली), यशवंत नगर.

 वीजपुरवठा खंडित

तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका मुंबईत काही ठिकाणी वीज सेवेलाही बसला. वर्सोवा आणि कुर्ला परिसरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वर्सोवा सात बंगला परिसरात दुपारी दोन वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. रस्त्यानजीकच्या डीपीमधील वीजपुरवठा करणाऱ्या वायरमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तर यारी रोड परिसरातील सरला सहकारी गृहनिर्माण संस्थेतही दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अर्धा तास वीज गेली होती. कुर्ला पश्चिामेला स्टेशन रोड परिसरातही दुपारी ३.३० वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी याबाबत अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीकडे ट्विटरवरून तक्रारी नोंदविल्या होत्या.

मुंबईतील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)

एच-पूर्व विभाग (२४२), चिंचोळी अग्निशमन केंद्र (२३६), के-पश्चिम विभाग (२३१), डी विभाग (२२९), वरळी अग्निशमन केंद्र (२१६), जी दक्षिण विभाग (२१६), कांदिवली अग्निशमन केंद्र (२०६), गोरेगाव विभाग (२०४), विलेपार्ले (२०२), मनपा मुख्यालय (१९१), विक्रोळी अग्निशमन केंद्र (१०६), एल विभाग (१०१), एन विभाग कार्यालय (९८), भांडुप संकुल (९७), एस विभाग (७७)

वृक्ष उन्मळल्याच्या ४७९ तक्रारी

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात मुंबईतील तब्बल ४७९ वृक्ष वा झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्याच्या तक्रारी पालिके कडे नोंदविण्यात आल्या. यापैकी १५६ तक्रारी शहरातून, ७८ तक्रारी पूर्व उपनगरांतून, तर २४५ तक्रारी पश्चिम उपनगरांतून करण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:24 am

Web Title: heavy rain flood effected property damage disrupts water traffic on roads akp 94
Next Stories
1 पावसाचा रुग्णसेवेवर विशेष परिणाम नाही
2 रेल्वेसेवाही दिवसभर विस्कळीत
3 विविध दुर्घटनांमध्ये आठजण जखमी
Just Now!
X