मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून संथगतीने सुरु आहे.

हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
मुंबईत शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिली आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय –
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.