डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सहा स्थानकांवर ‘एमडॅक्स’चा उपक्रम

एचआयव्ही चाचणीबाबत समाजामध्ये असलेला नकारात्मक दृष्टिकोन दूर व्हावा, यासाठी १ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील सहा रेल्वे स्थानकांवर मोफत एचआयव्हीची चाचणी करण्यात येणार आहे. १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्ताने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था (एमडॅक्स) हा उपक्रम राबवणार आहे.

समाजामध्ये ‘एचआयव्ही’कडे आजही तुच्छतेने पाहिले जाते. त्यामुळे या आजाराची चाचणी करून घेण्यात टाळाटाळ केली जाते. परिणामी, निदानास आणि उपचार मिळण्यास विलंब होतो. ही स्थिती बदलावी म्हणून, यंदाचा जागतिक एड्स दिन ‘नो युवर स्टेटस’ ही संकल्पना घेऊन जगभरात साजरा केला जाणार आहे. मधुमेह किंवा रक्तदाबाप्रमाणेच एचआयव्हीची चाचणीदेखील सहजपणे केली जावी, या उद्देशाने एमडॅक्सने मुंबईतील सहा रेल्वे स्थानकांवर मोफत एचआयव्ही चाचणीचा उपक्रम हाती घेतला आहे. १ ते ७ डिसेंबर या काळात पश्चिम रेल्वेच्या बोरिवली, अंधेरी, दादर आणि मध्य रेल्वेच्या घाटकोपर, कुर्ला, सीएसटी अशा एकूण सहा स्थानकांवर ही चाचणी केली जाणार आहे.

मधुमेहाच्या चाचणीप्रमाणेच बोटातून रक्त घेऊन ही चाचणी केली जाईल. चाचणीचा अहवाल २० मिनिटांत देण्यात येईल. संशयित रुग्णांना त्यांना सोयीस्कर ठरेल अशा केंद्रामध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येईल. समुपदेशकही उपस्थित राहतील, असे एमडॅक्सच्या डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.

वस्त्यांमध्ये आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये ही चाचणी करण्यास सांगितले जाते, तेव्हा ‘आम्हाला हा आजार होणार नाही,’ असे सांगून चाचणी करणे टाळले जाते. तेव्हा ही चाचणी करून घेण्याची मोहीम उभी राहणे आवश्यक आहे. एमडॅक्सकडे सध्या सुमारे ३८ हजार एचआयव्हीग्रस्तांची नोंदणी झाली आहे, परंतु ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. वेळीच उपचार मिळावेत यासाठी मोठय़ा प्रमाणात चाचणी होणे गरजेचे असल्याचेही डॉ. आचार्य यांनी सांगितले.

सवलतीच्या दरात चाचणी

एमडॅक्स आणि मेट्रोपोलिस यांच्या सहकार्याने मुंबईतील मेट्रोपोलिस प्रयोगशाळेच्या सर्व केंद्रांवर १ ते ७ डिसेंबर या आठवडय़ात ७५ रुपयांत एचआयव्हीची चाचणी केली जाणार आहे. मेट्रोपोलिसमध्ये या चाचणीसाठी साडेपाचशे रुपये शुल्क आकारले जाते. परंतु या उपक्रमाअंतर्गत अल्प दरात चाचणी केली जाणार आहे. मुंबईत सुमारे सातशेहून अधिक केंद्र या प्रयोगशाळा असून त्याचा फायदा घेत अधिकाधिक नागरिकांनी एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन एमडॅक्सने केले आहे.