करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीपर्यंत घरपोच मद्यविक्रीला अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील २८ जिल्ह्य़ांत ही घरपोच मद्यविक्री लागू होणार आहे. पुण्यात टोकन पद्धतीने मद्यविक्रीला परवानगी असली तरी  मुंबई, ठाणे व नवी मुंबईबाबत अद्याप निर्णयम् झालेला नाही. घरपोच मद्यविक्रीचा निर्णय करोनाबाधित परिसरांना लागू नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह यांनी हा आदेश जारी केला. मद्यविक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमप यांनी याआधीच जारी केलेल्या आदेशातील तरतुदी घरपोच मद्यविक्रीसाठीही लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर मुंबईत पालिका आयुक्तांनी हिरवा कंदिल दाखविला होता. परंतु ग्राहकांची गर्दी झाल्यानंतर तो निर्णय रद्द केला होता. ठाण्यात मात्र परवानही देण्यात आली नव्हती. पुण्यात करोनाबाधित परिसर नसलेल्या परिसरात ई-टोकनद्वारे मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली होती. मुंबईतही अनेक परिसर करोनामुक्त असून त्या ठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करता येईल, असे उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी अंतिम निर्णयम् पालिका आयुक्तांवर अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी मिळाली तरच घरपोच मद्यविक्री मुंबईत सुरू होऊ शकेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

परवाना नसल्यास..

ज्यांच्याकडे परवाना नसेल त्यांना ऑनलाईन परवाना काढता येणार आहे. वर्षभरासाठी दोनशे रुपये तर आजीवन परवान्यासाठी दोन हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अन्यथा प्रतिदिन पाच रुपये आकारूनही त्यांना परवाना मिळणार आहे. घरपोच मद्यविक्री ग्राहकाच्या निवासी पत्त्यावर करणेच बंधनकारक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. घरपोच विक्रीसाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, त्या व्यक्तीने करोनाविषयक नियमांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मद्य असे मिळेल..

आता ग्राहकाला मद्यखरेदीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर आपल्या जिल्ह्य़ातील विशिष्ट दुकानात मद्यखरेदीबाबत नोंद करावयाची आहे. मद्यविषयक परवान्याचा तपशील त्याला द्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित दुकानदार ग्राहकाच्या निवासी पत्त्यावर नियमानुसार मद्य घरपोच पाठविणार आहे. ज्याच्याकडे मद्याचा परवाना नसेल त्यांच्यासाठी एक दिवसाचा परवाना दुकानदारानेच सोबत घेऊन जायचा आहे.