22 September 2019

News Flash

पोलीस दलात १२ हजार होमगार्ड

वर्षांतून २०० दिवस रोजगार मिळणार

कायमस्वरूपी नियुक्ती; वर्षांतून २०० दिवस रोजगार मिळणार

राज्यातील पोलिसांना साहाय्यभूत ठरणाऱ्या गृहरक्षक दलाला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलण्याचे ठरविले आहे. या जवानांचा राज्यातील पोलिसांसाठी वापर करून घेण्याचेही ठरविण्यात आले आहे. राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी १२ हजार जवान कायमस्वरूपात पुरविण्यात आले आहेत. प्रत्येक जवानाला वर्षांतून किमान २०० दिवस रोजगार देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

सुरक्षा यंत्रणेसाठी गृहरक्षक दल हे महत्त्वाचे अंग असले तरी त्याकडे दुर्लक्ष झाले होते. महासंचालक दर्जाचा पोलीस अधिकारी या दलाचा प्रमुख आहे. मात्र आतापर्यंत या दलात नियुक्ती झालेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी या दलाकडे फारसे पाहत नव्हते. विद्यमान महासंचालक संजय पांडे आणि अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांनी मात्र या दलाची क्षमता वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. या दलात सामील होणाऱ्या प्रत्येक जवानाला यापुढे किमान २०० दिवस तरी रोजगार मिळेल, अशा रीतीने प्रयत्न केले जाणार आहेत.

रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी याआधीच १५०० जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या जवानांकडून महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापर केला जात आहे. मुंबईसाठी ९४० जवानांची क्षमता निश्चित करण्यात आली आहे. तूर्तास ३०० जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ठाणे तसेच ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्य़ासाठी एकूण ५०० तसेच राज्यासाठी ११ हजार १०० अशा रीतीने सुमारे १२ हजार जवान पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ५३ हजार जवान सामावून घेण्याची क्षमता असलेल्या या दलाकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले होते. या वेळी झालेल्या भरतीमुळे आता या दलातील जवानांची संख्या ४४ हजारांपर्यंत पोहोचली आहे.

पोलीस पाटील आणि गृहरक्षक दलातील जवानांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यातील पोलिसांनीही कायमस्वरूपी जवान तैनात करण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार १२ हजार जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या जवानांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.          – प्रशांत बुरडे, अतिरिक्त महासंचालक, गृहरक्षक दल.

First Published on August 26, 2019 1:26 am

Web Title: home guard maharashtra police mpg 94