लसीकरण मोहिमेतील सहभागासाठी पालिकेकडून तपासणी

मुंबई : मार्च महिन्यापासून सुरू होणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांच्या करोना लसीकरण मोहिमेसाठी सध्या असलेल्या रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यासाठी पालिकेने पाहणी सुरू केली आहे. विविध विमा योजनेत सहभागी असलेल्या ३५ सरकारी रुग्णालयांचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेकडून या रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील, सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही संख्या अधिक असल्याने लसीकरण केंद्राची संख्या वाढविणेही गरजेचे आहे. त्यामुळे आता खासगीसह इतर सरकारी रुग्णालयांचा समावेश करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यानुसार खासगी रुग्णालयांसह प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसह इतर विमा योजनेत सहभागी असणाऱ्या रुग्णालयांमध्येही लस उपलब्ध करून देण्यात आहे.  मुंबईतील अशा ३५ रुग्णालयांची यादी केंद्रीय आरोग्य विभागाने दिली असून लसीकरणाच्यादृष्टीने सर्व सोईसुविधा उपलब्ध आहेत का याची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार नोंदणी करून लसीकरण प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना सहभागी करण्यात आले असून ३२ रुग्णालयांना परवानगी दिली आहे. यातील १२ रुग्णालयांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणही सुरू झाले आहे. मार्चपासून आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असे काकाणी यांनी सांगितले.

११ लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

मुंबईत सध्या साधारण १ लाख २१ हजार आरोग्य आणि सुमारे ८७ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत सुमारे ११ लाख ४० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून यात सुमारे ६ लाख ५२ हजार आरोग्य कर्मचारी आणि सुमारे ३ लाख ५७ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सूचनांची प्रतीक्षा

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या नोंदणीसह नियमावलीबाबत अजून तरी कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, असे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.