पदार्थ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. काही पदार्थ झटपट तयार होतात आणि लगेच खावे लागतात. तर काही पदार्थ तयार व्हायला वेळ लागतो आणि त्यानंतरसुध्दा विशिष्ट कालावधीनंतरच ते खायला मजा येते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आपण सर्वांच्याच आवडीच्या आइस्क्रीमचंच उदाहरण घेऊयात ना. आइस्क्रीम बनवल्यानंतर ते कमीत कमी चार ते सहा तास अतिशय थंड तापमानात ठेवावे लागते. त्यानंतरच गारेगार आइस्क्रीम खाण्यात खरी मजा असते. पण तुम्हाला या नेहमीच्या पध्दतीपेक्षा वेगळ्या पध्दतीने तयार केलेलं आणि बाजारातील प्रस्थापित ब्रॅन्डच्या तुलनेत अतिशय हटके फ्लेवर्स चाखायचे असतील तर गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत ‘हॉट आर्टीसन क्रिएशन्स’ (HAUTE) या नावाने सुरू झालेल्या नव्याको-या भारतीय ब्रॅन्डला भेट द्यावी लागेल.

मूळचे ठाण्याचे असलेल्या भार्गव अय्यर आणि गायत्रीने कामाच्या निमित्ताने काही काळ न्यूझीलंडमध्ये वास्तव्य केल्यानंतर ते भारतात परतले आणि आपल्या आवडीचं व्यवसायात रूपांतर केलं. भार्गव हे गेली बारा वर्ष शेफ म्हणून काम करत आहेत. गायत्रीने कायद्याचं शिक्षण घेतलं असलं तरी तिनेही बेकरी पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. बाजार, लोकांच्या आवडीचा अभ्यास आणि भरपूर प्रयोग केल्यानंतर दोघांनीही ‘हॉट’ म्हणजेच फ्रेंच भाषेत ‘हाय क्लास’ या नावाने आइस्क्रीम ब्रॅन्डची सुरूवात केली. ‘हॉट’मध्ये मोठ्या कंपन्यांसारखं एकत्रच शेकडो लीटर आइस्क्रीम तयार न करता छोट्या बॅचमध्ये आइस्क्रीम तयार केलं जातं. त्यानंतर आइस्क्रीम तब्बल अठ्ठेचाळीस तास वेगवेगळ्या तापमानाला थंड केली जातात. पण इथेच प्रक्रिया संपत नाही. खरी प्रक्रिया त्यानंतर सुरू होते. कारण ४८ तासांनंतर ते आइस्क्रीम हाताने चर्न केलं जातं आणि पुन्हा थंड करायला ठेवलं जातं. दूध, साखर आणि आवश्यक फ्लेवर अशा तीनच घटकांपासून प्रत्येक फ्लेवरचं आइस्क्रीम तयार होतं. त्यामध्ये कुठलाही अनैसर्गिक रंग किंवा संरक्षक घटक टाकले जात नाहीत. वेगवेगळ्या तापमानाला जास्तीत जास्त काळ आइस्क्रीम ठेवल्याने आणि पुन्हा हाताने चर्न केल्याने त्या पदार्थाची मूळ चव त्यात उतरते आणि हेच या आइस्क्रीमचं वेगळेपण आहे. वाईन जितकी जुनी तितकी ती अधिक चवदार. साधारणपणे तोच फंडा इथे आइस्क्रीम बनवताना वापरला जातो.

फ्रूट फ्रेंझी, प्युअर इंडलजन्स आणि स्पाईक्ड सेंनसेशन अशा तीन प्रकारात आइस्क्रीमची विभागणी करण्यात आलेली आहे. संत्र, आंबा, मस्कमेलन, कलिंगड, पॅशन फ्रूट, कोकोनट या फळांपासून आइस्क्रीम तयार करण्यासाठी फळांची आयात थेट शेतक-यांकडून केली जाते. कारण विशिष्ट चवीची फळंच आइस्क्रीमसाठी वापरण्यात येतात. त्यामुळे हवी तशी फळं उपलब्ध न झाल्यास तो फ्लेवर तयारच केला जात नाही.

सध्या बावीस फ्लेवर्स इथे मिळतात. पण येत्या ८ एप्रिलपासून संपूर्ण ब्रॅन्डचा कायापालट होणार असून तो HAWTE म्हणजेच Have a wonderful time everytime या नावाने ओळखला जाणार आहे. त्याचवेळेस पवईबरोबरच चेंबुर, मुलुंड, ठाणे, लोखंडवाला, कांदिवली ठाकूर व्हिलेज आणि पंणजी (गोवा) येथेही आइस्क्रीम पार्लर्स सुरू होतील. शिवाय मेन्यूमध्ये आणखी २८ नवीन फ्लेवर्सही दाखल होऊन एकूण फ्लेवर्सची संख्या पन्नासच्या घरात जाईल. इथलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ओपन किचन. परंतु इतर आइस्क्रीम पार्लरमध्ये ज्याप्रमाणे काचेतून आइस्क्रीम दिसतात तशी इथे दिसत नाहीत. तुम्ही फ्लेवर सांगा तो तुम्हाला चाखण्यासाठी दिला जाईल. मग आवडलेल्या फ्लेवर्सचा फक्त स्कूप कपमध्ये भरून न देता प्रत्येक फ्लेवरला विशिष्ट पध्दतीने सजवून तुमच्या स्वाधिन केला जातो.

इथल्या अल्कोहोल मिश्रित आइस्क्रीमला भरपूर प्रसिध्दी मिळाली असली तरी त्यामागचं गिमिक फारच कमी लोकांना ठाऊक आहे. खरंतर दारू आणि दूध हे विरूध्दअन्न. त्यामुळे नशा ज्यामुळे चढते ते इथनॉल कंटेट पूर्णपणे काढून फक्त त्या प्येयाचा फ्लेवरच आइस्क्रीममध्ये वापरला जातो. तोदेखिल एक लीटर दुधामागे अवघं ६० मिली. त्यामुळे अल्कोहोलिक आइस्क्रीम खाल्यावरही ते चढत नाही. शिवाय एजिंग आणि चर्निंगप्रोसेमुळे ते अधिकाधिक क्रिमी आणि स्मूथ होऊन त्याचा फ्लेवर अधिक स्ट्राँग होतो.

भारतात ज्याप्रमाणे चॉकलेटचा ‘डेरीमिल्क’ हा ब्रॅन्ड प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे न्यूझीलंडमध्ये ‘व्हिट्टेकर्स’ हा ब्रॅन्ड अतिशय लोकप्रिय आहे. इथल्या ‘डार्क चॉकलेट’, ‘आफ्टर ८’ सारख्या चॉकलेट आइस्क्रीममध्ये याच ब्रॅन्डच्या चॉकलेटचा वापर केला जातो. ब्राऊनी आइस्क्रीमसाठी लागणारी ब्राऊनी गायत्री स्वत: तयार करतात आणि त्याची चव अफलातून आहे. ओट्स, ड्रायफ्रूट्स, ऑरेंज ज्युस आणि दूध हा अनेकांच्या आवडीचा ब्रेकफास्ट. पण याच ब्रेकफास्टला इथे ‘बर्शर मुसली’ या नावाने आइस्क्रीममध्ये रूपांतरीत करण्यात आलंय. प्रोटीनचा हव्यास असणा-या जीमला जाणा-या तरूणाईसाठी त्यांच्याच विनंतीवरून हा फ्लेवर तयार करण्यात आल्याचं भार्गव सांगतात. ‘सिट्रस व्हाईट चॉकलेट’ यामध्येही चॉकलेट आणि ऑरेंज ज्युसचं कॉम्बिनेशन असलं तरी त्याला दिलेली फोडणी अतिशय वेगळी आहे.
फास्ट फूडमधील सर्वाधिक पसंतीच्या ‘पिझ्झा’ फ्लेवर्सचं आइस्क्रीमही येथे खायला मिळेल. ज्यांना ड्रायफ्रूट्स आवडतात त्यांच्यासाठी फ्रेंच टॉफी ‘नुगाट’ पासून तयार केलं जाणारं ‘नुगाट प्रिलाइन’, तर चॉकलेट चिली आणि टकीला फ्लेवरचं ए.एम.एफ. हे आणखी काही नवीन प्रयोग आहेत. पॅव्हलोवा हे दुधाच्या ऐवजी दह्याचा बेस असलेलं चवीला थोडसं आंबट आइस्क्रीमही आवर्जुन चाखण्यासारखं आहे.

भार्गवचा लहान भाऊ निखिल हा पवईतील पार्लर पूर्णवेळ सांभाळतो. आमची स्पर्धा ही बाजारातील इतर ब्रॅन्डसोबत नाही. लोकांनी आजवर न चाखलेले आणि त्यांनी मागणी केलेले फ्लेवर्स बनवणे हे आमचं उद्दीष्ट आहे आणि राहिल, असं भार्गव सांगतात. त्यामुळे आइस्क्रीमच्या दुनियेत होणारे हे वेगळे प्रयोग एकदातरी आवर्जुन चाखायला हवेत.

हॉट आर्टीसन क्रिएशन्स

  • कुठे ?:- शॉप नं. १०, इडेन २ सोसायटी, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई</li>
  • कधी ?:- सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत. शनिवार आणि रविवार दुपारी १ ते रात्री १२ वाजेपर्यंत.

@nprashant

nanawareprashant@gmail.com