रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी दादर ते माटुंगादरम्यान रेल रोको केला असल्या कारणाने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या रेल रोकोमुळे सकाळी कामावर पोहोचण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक कुर्ल्यापर्यंतच सुरु आहे. कुर्ल्याहून डाऊनला ठाणे, कर्जत, कसारा लोकल सोडण्यास सुरु आहे, मात्र सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना कुर्ल्यातच उतरावं लागत आहे. दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे दिसते, मग प्रशासनाला माहिती का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे दिसते, मग प्रशासनाला माहिती का नाही? आंदोलकांचे प्रतिनिधी सोबत येवो किंवा न येवो, आम्ही रेल्वेमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर मागण्या मांडणार’.

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

रेल रोकोचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले.

सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी आहेत. आधी रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पर्यायी मार्ग –
सीएसएमटीच्या दिशेने जाणारे प्रवासी एका पर्यायी मार्गाचा वापर करु शकतात. मध्य रेल्वेचे प्रवासी घाटकोपरला उतरुन मेट्रोने अंधेरीला जाऊ शकतात, आणि तेथून चर्चगेट गाठू शकतात. चर्चगेटला पोहोचल्यानंतर आपल्या इच्छित स्थळी पोहोचता येईल. दरम्यान मुंबई बेस्ट प्रशासनाने कुर्ला, घाटकोपर आणि मुलुंडमधून ज्यादा बसेस सोडण्याचा आदेश दिला आहे.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या –
१. २० टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा.
२. रेल्वे अॅक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील स्थानिक भुमीपुत्रांना व इतर राज्यातील भुमीपुत्रांना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे.
३. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवेत समाविष्ट करणे आणि भविष्यातही नियम लागू ठेवावे.
४. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची वन टाइम सेटलमेंट एका महिन्याच्या आत रेल्वे सेवेत समाविष्ट झालेच पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे नियम अटी लागू करु नये.