News Flash

शेकडो बोटी वादळात उद्ध्वस्त

वादळाच्या पाश्र्वभूमीवर मच्छीमारांनी त्यांच्या नौका रविवारीच किनाऱ्यावर आणून ठेवल्या होत्या.

मुंबई, ठाणे, पालघर किनारपट्टीवरील मच्छीमारांना फटका

मुंबई : अरबी समुद्रातून गुजरातकडे प्रयाण करताना मुंबईसह कोकण किनारपट्टीला तडाखा देणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांच्या किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे. किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या शेकडो बोटी वादळाच्या तडाख्याने फुटून उद्ध्वस्त झाल्या असून अनेक बोटींना जलसमाधी मिळाली. मच्छीमारांचे झालेले नुकसान आणि कोळीवाडय़ांतील हानीची पाहणी करून सरकारने मदत करावी, अशी मागणी या समुदायाकडून होत आहे.

वादळाच्या पाश्र्वभूमीवर मच्छीमारांनी त्यांच्या नौका रविवारीच किनाऱ्यावर आणून ठेवल्या होत्या. नांगर टाकून त्या वाहून जाणार नाहीत अशा पद्धतीने त्या बांधण्यात आल्या होता, परंतु वाऱ्याचा वेग आणि खवळलेला समुद्र यामुळे बोटी एकमेकांना आदळल्या. कुलाबा, माहीम, खार दांडा, ट्रॉम्बे, उत्तन, पालघर येथील किनाऱ्यांवर शेकडो बोटींचे नुकसान झाल्याची माहिती मच्छीमारांनी दिली.  माहीम किनारपट्टीत दोन मच्छीमार नौका उद्ध्वस्त झाल्या असून या नौकेतील एक मच्छीमार अद्याप बेपत्ता आहे, तर दोन मच्छीमारांना प्रशासनाने सुखरूप किनाऱ्यावर आणले आहे. खारदांडा येथेही काही नौका वाहून गेल्या. त्यात दोन मच्छीमार बेपत्ता झाले.

बोटींचे नुकसान

कुलाबा, ससून डॉक येथे ५२ बोटी, तर ट्रॉम्बे येथे जवळपास ४० बोटी फुटल्या. वांद्रे-वरळी सी-लिंकच्या नजीक एक मच्छीमार नौका अडकलेली होती. मंगळवारी दुपारी ती बाहेर काढण्यात आली. तर खार दांडा, माहीम, वरळी बंदरावर १२ ते १४ बोटी फुटल्या.

मासे महागणार

वादळच्या पूर्वसूचनेमुळे चार दिवसांपासून मच्छीमारांनी बोटी समुद्रात उतरवल्या नाहीत, तर गेलेल्या बोटीही दोन दिवस आधीच किनाऱ्यावर आल्या. वादळानंतर लगेचच मासेमारी करणे शक्य नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस अंदाज घेऊन मासेमारी केली जाईल. त्यामुळे येत्या आठवडय़ात माशांची उपलब्धता फारशी नसेल, परिणामी मासे महागतील,असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

किनाऱ्यालगत असलेल्या कोळीवाडय़ातील घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्या. त्यामुळे सरकारने नुकसान लक्षात घेऊन मच्छीमारांना अर्थसाहाय्य करावे. त्यासाठी कोळीवाडय़ाची पाहणी करून ज्याचे जितके नुकसान त्याला तितकी भरपाई द्यावी. तसेच बेपत्ता झालेल्या मच्छीमारांना ५ लाखांचा निधी तातडीने द्यावा.

प्रफुल्ल भोईर, सरचिटणीस, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:30 am

Web Title: hundreds of boats wrecked in the storm ssh 93
Next Stories
1 दादर, भायखळा भाजीमंडईतील वर्दळ ओसरली
2 देहविक्री करणाऱ्या महिलेची हत्या
3 म्हाडामध्ये सेवानिवृत्तांची खोगीर भरती!
Just Now!
X