केंद्राने राज्याला दिलेल्या ४० हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री करण्यात आल्याचा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दावा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला आहे. तसेच अशी विधानं करताना पुराव्यानिशी बोलावं असा सल्लाही फडणवीसांनी हेगडेंना दिला आहे.

केंद्र सरकारचा ४० हजार कोटींचा निधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील म्हणून देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांचे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये त्यांनी हा निधी पुन्हा केंद्राकडे पाठवून दिल्याचा दावा भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना केला होता. हेगडेंच्या या विधानामुळे राज्यात खळबळ उडाली असून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

आणखी वाचा- ही महाराष्ट्राशी गद्दारी; हेगडेंच्या विधानावर संजय राऊत संतापले

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी हेगडेंचा दावा फेटाळताना म्हटले की “हेगडे नक्की काय बोलले मला माहिती नाही. पण त्यांनी केलेला हा दावा शंभर टक्के धादांत खोटा आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना एकही धोरणात्मक घेतलेला नाही, त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचे आणि धादांत खोटं आहे. आम्ही एक नवा पैसाही केंद्राला परत केलेला नाही. केंद्राने तो मागितलेला नाही आणि देण्याचा विषयही येत नाही. बुलेट ट्रेनसाठी देखील केंद्राकडून महाराष्ट्राला कुठलाही निधी मिळालेला नाही. त्यासाठी एक कंपनी तयार करण्यात आली आहे, त्यामुळे यासाठी आलेला पैसा थेट त्या कंपनीकडे जाईल. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालेल्या माहितीवर वक्तव्य करण्यापेक्षा पुराव्यानिशी बोलण केव्हावी चांगलं.”