शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर, या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, प्रफुल्ल पटेल, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही.” असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

“जो कुणी भाजपाच्या नेत्याच्या किंवा धोरणाच्या विरोधात बोलेल त्याच्या मागे ईडीची चौकशी लावायची, सीबीआय चौकशी लावायची. सीबीआयबाबत तर आम्ही निर्णय घेतला आहे की, आमच्या परवानगी व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुणाचीही सीबीआय चौकशी होऊ शकत नाही. मात्र ईडीचा जो अधिकार आहे त्यांचा अधिकार आहे व त्याचा एकप्रकारे राजकारणासाठी वापर करणं हे महाराष्ट्रात कधी पाहिलं गेलं नाही.” असं अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तर “महाराष्ट्रासाठी ईडीचा हा खेळ नवा नाही. भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जात आहे. यातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेला आहे.

बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं-संजय राऊत

वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीवर प्रतिक्रिया देताना आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत, भाजपावर जोरदार टीका केली. “बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात.” अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे.