News Flash

इशरतबाबत हेडलीच्या जबानीने संभ्रम

झकी-उर रहमानकडून माहिती मिळाल्याचा दावा;बीएआरसीला भेट ; उपराष्ट्रपती निवासाचे चित्रीकरण

devid headley, डेव्हिड हेडली
डेव्हिड कोलमन हेडली

झकी-उर रहमानकडून माहिती मिळाल्याचा दावा;बीएआरसीला भेट ; उपराष्ट्रपती निवासाचे चित्रीकरण
गुजरात येथे कथित पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँबद्दल मला माहिती नव्हती. इशरतची माहिती मला झकी-उर रहमानकडून मिळाली, तर चकमकीबाबत प्रसिद्धीमाध्यमांकडून कळल्याचा दावा २६/११च्या हल्ल्याशी संबंधित खटल्यातील माफीचा साक्षीदार लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने शनिवारी विशेष न्यायालयासमोर करत संभ्रम निर्माण केला. एवढेच नव्हे, तर याबाबत आपण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सांगितले होते. मात्र त्यानंतरही जबाबात त्याचा समावेश का केला नाही हे माहीत नसल्याचे सांगत हेडलीने ‘एनआयए’च्या तपासावरही अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
खटल्यातील मुख्य आरोपी अबू जुंदाल याचे वकील वहाब खान यांच्याकडून गेले चार दिवस हेडलीची ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उलटतपासणी सुरू होती. शनिवारच्या सुनावणीत खान यांनी हेडलीला त्याने ‘एनआयए’च्या चौकशीत दिलेला जबाब आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांच्या आधारे उलटतपासणी घेऊन त्यातील तफावत उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. त्यातही इशरत प्रकरणाबाबत खान यांनी ही उलटतपासणी घेतली. त्या वेळी सुरुवातीलाच ‘एनआयए’ने चौकशीदरम्यान नोंदवलेला जबाब आपल्याला वाचून दाखवण्यात आला नव्हता. तसेच आज पहिल्यांदा उलटतपासणीच्या वेळी तो पाहत असल्याचा खुलासा हेडलीने केला. शिवाय इशरत जहाँ प्रकरणासह आपण अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत त्या ‘एनआयए’ने जबाबात का लिहिल्या व ज्या सांगितल्या त्या का लिहिल्या नाहीत, हे माहीत नसल्याचा दावा केला.
इशरत प्रकरणाबाबत आपल्याला झकी-उर रहमान- मुझम्मिल बट या दोघांकडून तसेच हल्ल्याचा प्रयत्न फसल्याचे व इशरत ठार झाल्याचे वृत्तपत्रांतून कळल्याचे हेडलीने न्यायालयाला सांगितले.
झकी-उर रहमानने लष्करच्या ज्या गटात आपण समाविष्ट होतो त्याचा प्रमुख असलेल्या मुझम्मिलशी भेट घालून दिली होती. त्या वेळी मुझम्मिलनेच अक्षरधाम आणि इशरत जहाँसारख्या अयशस्वी हल्ल्याचे प्रयत्न केल्याचे टोमण्याद्वारे सांगितले होते. परंतु हे दोन्ही हल्ले अयशस्वी का ठरले याचा अंदाज मी प्रसिद्धीमाध्यमांतील वृत्तांद्वारे लावला होता आणि त्याबाबत ‘एनआयए’ला सांगितले नव्हते. त्यानंतरही जबाबात ते का लिहिले आहे हे माहीत नसल्याचा दावा हेडलीने केला. इशरतला गुजरातच्या नाका परिसरात मारल्याचे मुझम्मिलने मला नंतर सांगितल्याचे, भारतीय नागरिक परंतु लष्करसाठी काम करणारी इशरतच होती, शिवाय मुझम्मिलने गुजरात-महाराष्ट्रात हल्ल्याचे कट रचल्याचेही ‘एनआयए’ला सांगूनही ते जबाबात नसल्याबाबत हेडलीने ‘का ते मला माहीत नाही’, असे उत्तर दिले.

.अनायासे चित्रीकरण
मुंबईतील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राला भेट दिल्याचे सांगताना दिल्लीतील सेनाभवन ते राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या रस्त्याचे चित्रीकरण करताना उपराष्ट्रपती निवासाचे चित्रीकरण केल्याचा खुलासा केला.

..म्हणून हेडलीची उलटतपासणी संपवली!
अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी हेडलीच्या उलटतपासणीसाठी चार दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु जुंदालशी चर्चा करायची असल्याचा दावा करीत उलटतपासणी रविवापर्यंत स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. परंतु चार दिवसांत जुंदालशी संबंधित वा त्याचा बचाव करणारे प्रश्न विचारण्याऐवजी शेवटच्या दिवशी त्याच्याशी सल्लामसलत करायची आहे हा खान यांचा दावा न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचा प्रकार आहे. एवढेच नव्हे तर हाफीज सईदचे वकीलपत्र घेतल्यासारखे ते उलटतपासणी करीत असल्याचे सुनावत आणि सुट्टय़ांमुळे जुंदालची भेटच झाली नाही असा खोटा दावा करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे नमूद करीत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांनी उलटतपासणी स्थगित करण्याची मागणी फेटाळली. तसेच उलटतपासणीही संपल्याचे जाहीर करून ती संपवली.

लष्करची महिला संघटना म्हणे सामाजिक गट
लष्करची महिला दहशतवादी संघटना होती की नाही हेही मला माहिती नसल्याचा खुलासा हेडलीने केला. एवढेच नव्हे, तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीतही महिला संघटना म्हटले होते. परंतु आपण ज्या महिला संघटनेबाबत सांगितले ती महिलांच्या आणि सामाजिक प्रश्नांवर काम करते असा दावाही हेडलीने केला.

हाफीजला बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता..
कलानगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घराबाहेरून पाहणी केल्याची आणि त्यांच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाकडे चौकशी केल्याचा खुलासाही हेडलीने केला. हाफीज सईदशी याबाबत चर्चा झाली असता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवायचा होता, असे त्याने मला सांगितले होते. त्यावर बाळासाहेबांचे काम करण्यासाठी सहा महिने लागल्याचे मी त्याला सुचवल्याचा दावा हेडलीने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2016 3:20 am

Web Title: i have no personal knowledge about ishrat jahan david headley
टॅग : David Headley
Next Stories
1 उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी
2 राम नारायण यांना भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार प्रदान
3 मुखपृष्ठावर ‘तंत्रकले’ची छाप!
Just Now!
X