आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला २०१०मध्ये केलेल्या एका इमारत विक्रीची चौकशी प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. मुंबईतील मोक्याच्या मध्यवर्ती भागातील ही इमारत बाजारभावापेक्षा अतिशय कमी किंमतीत व्हिडीओकॉनला विकली गेल्याचे उघड झाले आहे.

करचुकवेगिरीच्या संशयावरून आयसीआयसी बँक आणि व्हिडीओकॉनमधील व्यवहारांची प्राप्तिकर विभाग कसून चौकशी करीत आहे. त्यादरम्यान हा इमारत विक्री व्यवहार समोर आला आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील राधिका अपार्टमेंट ही १३ मजली आणि २७ सदनिकांची इमारत पूर्वी आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी वापरली जात होती. ती २०१०मध्ये बँकेने वेणुगोपाल धूत प्रवर्तित व्हिडीओकॉन समूहाला बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकली गेली. त्यावेळी २५ हजार रुपये प्रतिचौरस फुटाचा भाव असताना अवघ्या १७ हजार रुपये प्रतिचौरस फूट या भावाने ही इमारत व्हिडीओकॉनला दिली गेल्याचे समजते.

या चौकशीबाबत आणि या विक्री व्यवहाराबाबत एक्स्प्रेस समूहाच्या प्रतिनिधीने वारंवार दूरध्वनी संपर्क करूनही आयसीआयसी बँक आणि व्हिडीओकॉन समूहाकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही.

धूत यांनी २०१०मध्ये ‘न्यूपॉवर रिन्युएबल्स प्रा. लि.’ या कंपनीत ६४ कोटी रुपये दिले. ही कंपनी त्यांनी आयसीआयसी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंद्रा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांसह स्थापन केली होती. त्यानंतर २०१२मध्ये व्हिडीओकॉन समूहाने २०१२मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी ‘न्यूपॉवर रिन्युएबल्स प्रा. लि.’ या कंपनीची मालकी अवघ्या नऊ लाख रुपयांना दीपक कोचर यांच्या ट्रस्टकडे सुपूर्द केली. त्यानंतर २०१७मध्ये व्हिडीओकॉनने घेतलेल्या ३,२५० कोटी रुपयांपैकी २,८१० कोटी रुपये म्हणजेच ८६ टक्के कर्ज हे आयसीआयसीआय बँकेने थकित कर्ज म्हणून नोंदवायला सुरूवात केली होती.