|| प्रसाद रावकर

निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रावरील आडनावातील चूक दुरुस्त करण्यासाठी गेल्या २४ वर्षांमध्ये चार वेळा अर्ज केल्यानंतरही सुधारणा होऊ शकलेली नाही. चौथ्यांदा हाती पडलेल्या ओळखपत्रावरील आडनावात सुधारणा झाली, पण वडील, पती यांची चुकीची नावे नमूद करण्यात आली आहेत. तसेच निवासाचा पत्ताही चुकविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या या भोंगळ कारभारामुळे वरळी गावातील महिला मतदार मेटाकुटीस आली आहे.

मतदान करण्याऱ्या मतदारांची ओळख पटावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र देण्यास सुरुवात केली. वरळी गावातील रहिवासी वैशाली गं. बोबले यांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्यानंतर १ जानेवारी १९९५ रोजी मतदार ओळखपत्र मिळाले. मात्र या ओळखपत्रावर त्यांचे आडनाव ‘बोबले’ऐवजी ‘बोबरे’ करण्यात आले होते.

आडानावातील चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाच्या वरळीतील संबंधित कार्यालयात खेटे घातले. पण त्यांच्या पदरी निराशा आली.

प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे कर्मचारी घरोघरी जात असून या कर्मचाऱ्यांकडे वैशाली यांनी ओळखपत्रातील आडनावात चूक असल्याची व्यथा मांडली. बोबले यांनी २०००, २००५ आणि २०१० मध्ये मतदारयादी अद्यायावत करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडे आडनावातील दुरुस्तीसाठी अर्जही भरून दिला होता.

दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाकडून त्यांना पुन्हा एकदा मतदार ओळखपत्र पाठविण्यात आले. मात्र त्यांच्या आडनावातील चूक ‘जैसे थे’च होती. ही चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी २१ जून २०१९ रोजी वरळी येथील मतदान

नोंदणी कार्यालयात पुन्हा एकदा अर्ज केला.निवडणूक आयोगाने त्यांना एक नवे मतदार ओळखपत्र पाठविले. या ओळखपत्रावरील आडनावात केलेली सुधारणा योग्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  मात्र त्यांचे वडील आणि पतीचे नाव बदलण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वडिलांचे

नाव हैबती कदमऐवजी दत्ताराम नाईक, तर पतीचे नाव गंगारामऐवजी दत्ताराम करण्यात आले आहे. या नव्या चुका पाहून त्या चक्रावल्याच. मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी आता आणखी किती अर्ज करायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

मतदार ओळखपत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदानाच्या वेळी मतदाराची ओळख पटविण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते. मात्र आपल्या मतदार ओळखपत्रावरील नावात चूक असल्यामुळे मतदान केंद्रामध्ये समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नावातील चूक सुधारण्यासाठी चार वेळा अर्ज केला. आता आडनावातील चूक सुधारण्यात आली. पण वडील आणि पतीचे भलतेच नाव ओळखपत्रावर नमूद करण्यात आले आहे. चुका सुधारण्यासाठी किती वेळा अर्ज करायचा?

– वैशाली बोबले, त्रस्त मतदार