देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान; भाजपच्या राज्य अधिवेशनाचा समारोप

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घेऊन जनादेश मिळवावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सरकारला दिले. तसे झाल्यास भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत फडणवीस यांनी भाजप तीनही पक्षांना एकटय़ानेही पुरून उरेल, असे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला राममंदिर उभारण्याची घोषणा करून ट्रस्ट स्थापन केला आहे. काही जण अयोध्येला जाणार असल्याचे सांगत आहेत. त्यांनी अयोध्येला जरूर जावे. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे स्मरण होईल, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

फडणवीस यांनी भाजपच्या नवी मुंबईतील दोन दिवसीय राज्य अधिवेशनाचा समारोप केला.

फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भीमा-कोरेगावप्रकरणी विशेष चौकशी पथकाकडे तपास सोपवायचा होता. मतांचे राजकारण त्यामागे होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीर राहिले. आता चौकशीतून सत्य बाहेर येईलच. देशविरोधी कारवाया करणऱ्यांना आम्ही पाठीशी घालू देणार नाही. या सरकारने गेल्या ८० दिवसांमध्ये शेतकरी व इतरांची फसवणूक केली आहे.

हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. एकमेकांमधील विसंवादातून ते पडेल. ते तिघेही एकत्र अंगावर आले किंवा निवडणूक लढले, तरी भाजप त्यांना पुरून उरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.२२ तारखेला धरणे आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

नागरिकत्व कायदा दुरुस्ती, राष्ट्रीय लोकसंख्या सूची आदींबाबत गैरसमज पसरविले जात आहेत. अनुच्छेद ३७० रद्द केल्याबाबतही अपप्रचार करण्यात आला, पण आता जम्मू व काश्मीरचा विकास वेगाने होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयांबाबत अभिनंदन करणारे राजकीय ठरावही अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

शिवसेनेकडून विश्वासघात -चंद्रकांत पाटील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची आस पूर्ण करण्यासाठी आणि मुलाला मंत्री करण्यासाठी विश्वासघात केल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेनेने युती तोडली असती, तर भाजपने स्वबळावरच सत्ता मिळविली असती, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.मात्र हे सरकार पडेल व आपली सत्ता येईल, या स्वप्नात न राहता प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असे खडे बोलही पाटील यांनी पक्षाच्या  नेत्यांना सुनावले.  नवी मुंबईत झालेल्या राज्य अधिवेशनात पाटील यांनी प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

‘स्वबळावर सत्ता आणावी’

प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावून राज्यात भाजपला पुन्हा स्वबळावर सत्तेत आणण्याचे आवाहन भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले. भाजपच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पक्षाच्या राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, माजी खासदार उदयनराजे भोसले, नारायण राणे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या वेळी उपस्थित होते. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र आमच्या मित्रपक्षाने विश्वासघात करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली.