News Flash

राज्यात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री

गर्भपाताची औषधे (एमटीपी किट) नोंदणीकृत स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय किरकोळ वा ठोक विक्रेत्यांना विकता येत नाहीत.

१४ गुन्हे दाखल, ११ जणांना अटक, ४२ औषध दुकानांना नोटीस
मुंबई : राज्यात गर्भपातावरील औषधांची (एमटीपी किट)ची अवैध विक्री होत असल्याची बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत समोर आली आहे. राज्यभरातील ३८४ ठिकाणांची तपासणी केली असता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय, चढ्या दरात ही औषधे विकली जात असून अन्य नियमांचे उल्लंघन औषध विक्रेत्यांसह डॉक्टरांकडून केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे तर ४२ औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

गर्भपाताची औषधे (एमटीपी किट) नोंदणीकृत स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय किरकोळ वा ठोक विक्रेत्यांना विकता येत नाहीत. औषधांची विक्री करताना रुग्णांची-डॉक्टरांची सर्व माहिती नोंदवणे आणि खरेदी देयके ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. असे असताना या सर्व नियमांचे उल्लंघन करत राज्यात या औषधांची अवैध विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. ‘एफडीए’च्या मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद मंडळात २६ जून ते ९ जुलैदरम्यान विशेष मोहिमेअंतर्गत ३८४ ठिकाणी छापा टाकण्यात आल्याची माहिती डी.आर. गहाणे, सहआयुक्त, (औषधे) मुख्यालय, एफडीए यांनी दिली आहे.

राज्यभरात १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १३ किरकोळ विक्रेते आहे. पश्चिम उपनगरातील डॉक्टरांनी त्यांना झालेल्या या औषधांच्या पुरवठ्याचा वापर कसा आणि कोठे केला याची पोलिसांना माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे या डॉक्टरविरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी ४२ औषध विक्रेत्यांकडूनही काही नियम मोडले जात असल्याचे लक्षात आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान १४ गुन्ह्यांत ११ जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे गहाणे यांनी सांगितले आहे.

परवानाधारक संस्थेकडूनच औषधे खरेदी करून डॉक्टरांच्या चिठ्ठीनेच विक्री करण्यात यावी. अन्यथा औषध विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने विक्रेत्यांना दिला आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधे घेण्याचे आवाहन प्रशासनाने जनतेला केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:21 am

Web Title: illegal sale of abortion drugs in the state akp 94
Next Stories
1 अजोय मेहता यांची सदनिका वादात
2 चोरवाटांमुळे रुळांवर अपघात
3 लससाठय़ाअभावी कांजूरमार्गच्या शीतगृहांचा वापरही मर्यादित
Just Now!
X