माजी रेल्वे अधिकारी, वाहतूक तज्ज्ञांचे मत

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर प्रत्यक्षात अवतरली असली तरी जादा भाडे, अवेळी धावणारी लोकल तसेच नियमित धावणाऱ्या लोकलच्या रद्द केलेल्या फेऱ्या या पाश्र्वभूमीवर सध्याच्या घडीला वातानुकूलित लोकल अशा प्रकारे चालवणे व्यवहार्य नसल्याचे मत माजी रेल्वे अधिकारी आणि वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या लोकल गाडय़ांसाठी स्वतंत्र कॉरिडोर, नियमित धावणाऱ्या लोकल गाडय़ांना वातानुकूलित डबे जोडण्याच्या पर्यायांबरोबरच भाडे कमी करण्याची सूचना तज्ज्ञांनी केली आहे.

वातानुकूलित लोकल गाडीच्या २५ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर प्रथम चर्चगेट ते बोरिवली मार्गावर दररोज सहा फेऱ्या सुरू केल्यानंतर १ जानेवारीपासून वातानुकूलित लोकलचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या वेळापत्रकात लोकलच्या विरापर्यंत बारा फेऱ्या सुरू करताना सध्याच्या नियमित धावणाऱ्या फेऱ्यांवर गदा आणण्यात आली. नियमित धावणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्याने काही प्रवाशांची मोठी गैरसोयही झाली. यासंदर्भात मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक आणि रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य (अभियंता) सुबोध कुमार जैन यांनी वातानुकूलित लोकलच्या देखभालीचा आणि ती चालवण्याचा खर्च अधिक असल्याचे सांगितले. भविष्यात वातानुकूलित लोकलची संख्या वाढल्यास खर्च वाढत जाईल आणि त्याचा भार प्रवाशांवर येईल. मेट्रोप्रमाणेच वातानुकूलित लोकलचे भाडेही रेल्वेला ठेवता येणार नाही. अशा अनेक गोष्टींचा सामना रेल्वेला आणि प्रवाशांनाही करावा लागेल. प्रवाशांना वातानुकूलित लोकलची सेवा देण्यासाठी स्वतंत्र रेल्वे कॉरिडोर असल्यास त्यावरून या लोकल चालवता येतील. त्यामुळे सध्याच्या नियमित लोकलही रद्द होणार नाही आणि ज्यांना वातानुकूलित लोकलचा प्रवास शक्य आहे, ते प्रवास करू शकतील, असे स्पष्ट केले.

वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनीही सध्याची वातानुकूलित लोकल गाडीची सेवा चांगली असली तरी अशी सेवा देताना अन्य प्रवाशांचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सध्याच्या नियमित धावणाऱ्या लोकल गाडीला तीन डबे वातानुकूलितचे जोडल्यास निर्माण झालेले अनेक प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांनाही त्रास होणार नाही आणि वातानुकूलित लोकल गाडीचा प्रवास ज्यांना शक्य आहे तेदेखील प्रवास करू शकतील, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी नऊ किंवा १२ डबा लोकल गाडीला वातानुकूलित डबे जोडून ती चालवणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य आहे का त्याची चाचपणी रेल्वेने केली पाहिजे. योग्य नियोजन करून वातानुकूलित लोकल गाडी धावल्यास वाहनांमुळे रस्ते वाहतुकीवर पडणारा ताणही कमी होईल, अशी आशाही व्यक्त केली.

  • सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर एका लोकलच्या दहा ते १२ फेऱ्या याप्रमाणे दिवसाला १, ३०० हून अधिक लोकल फेऱ्या होतात. दररोज ३५ लाखांहून अधिक प्रवासी या मार्गावरून प्रवास करत आहेत. सध्याच्या बिगरवातानुकूलित लोकलच्या एका फेरीतून चार ते पाच हजारांच्या दरम्यान प्रवासी प्रवास करत असल्याने वातानुकूलित लोकल गाडीला सध्या मिळणारा प्रतिसाद पाहिल्यास या गाडीला प्रवाशांची प्रतीक्षाच असल्याचे दिसते.
  • वातानुकूलित लोकल गाडीची एकूण प्रवासी क्षमता पाच हजार ९६४ एवढी आहे. यात १,०२८ बसून तर चार हजार ९३६ उभ्याने प्रवासी प्रवास करू शकतात.
  • २५ डिसेंबर रोजी वातानुकूलित लोकल गाडीतून ७३६ प्रवाशांनी प्रवास केला होता. १ जानेवारी २०१८ रोजी तीन हजार ३३४ प्रवाशांनी आणि ५ जानेवारी रोजीही तीन हजार १९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. आजवर ३७ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळाले आहे.