06 December 2019

News Flash

महामुंबईतला मराठी टक्का घसरतोय, हिंदीचा वाढतोय

मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्या तरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे. पण मागच्या काही वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बदल होत आहेत.

मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्या तरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे. पण मागच्या काही वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे मराठी मुंबईचा हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे. प्रत्येक मुंबईकर मूळचा कुठचा आहे त्यासंदर्भात संख्यात्मक विश्लेषण करणारी अलीकडची कुठलीही माहिती उपलब्ध नाहीय.

मातृभाषे संदर्भातला २०११ सालचा जनगणनेचा जो अहवाल आहे त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. २००१ साली मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या २५.८८ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ३५.९८ लाख झाले. त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत २.६४ टक्के घट झाली. २००१ साली ४५.२३ लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले.

मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. ठाणे, रायगडमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे. बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या फक्त नियोजन आणि धोरणांमध्येच बदल होत नाहीय तर या भागात नवीन राजकारणही आकाराला येत आहे. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष मुंबईने अनेकदा अनुभवला आहे. २००९ विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला याच मुद्दाचा फायदा झाला होता. त्यावेळी एकाच फटक्यात मनसेचे १३ आमदार निवडून आले होते.

मुंबई आधी बंदराचे शहर म्हणून ओळखले जात होते. मुंबईत कपडा मिल सुरु झाल्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर नागरिक मुंबईत स्थायिक झाले. मागच्या ४० वर्षात उत्पादन केंद्र ते सेवा उद्योग असा मुंबईमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार स्थलांतरचा पॅटर्नही बदलला आहे. आधी मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागातून नागरिक येऊन स्थायिक झाले. ज्यातील बहुसंख्याची बोलीभाषा मराठीच होती. पण मिलमधील नोकऱ्या कमी झाल्यानंतर मुंबईत उत्तर प्रदेश, बिहारमधून स्थलांतर वाढले. अत्यंत स्वस्तात हा कामगार उपलब्ध झाला.

महाराष्ट्राच्या अन्य भागातून मुंबईला होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण १९६१ साली ४१.६ टक्के होते ते २००१ साली ३७.४ टक्के झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण वाढले. १९६१ साली उत्तर प्रदेशातून मुंबईत १२ टक्के स्थलांतरीत येत होते तेच प्रमाण २००१ साली २४ टक्के झाले. स्थलांतर आणि शहर अभ्यास विभागाच्या राम बी भगत यांनी ही माहिती दिली. हे उत्तर भारतीय स्थलांतरीत असंघटित क्षेत्रात मोठया प्रमाणावर आहेत. इथे वेतनही कमी आणि कामाचीही हमी नसते.

मराठी मातृभाषिकांची संख्या कमी झाली असली तरी आजही अन्य भाषिकांच्या तुलनेत मुंबईत मराठी मातृभाषिकांची संख्या जास्त आहे.  २००१ साली मराठी मातृभाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ४५.२४ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले. त्याच दशकभरात गुजराती भाषिकांची संख्या किंचित कमी झाली. २००१ साली १४.३४ लाख लोकांनी गुजराती मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हीच संख्या १४.२८ लाख होती.

२००१ साली ऊर्दू भाषिक १६.८७ लाख होते. २०११ मध्ये हे प्रमाण १४.५९ लाख झाले. फक्त हिंदी भाषिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. २५.८२ लाखावरुन हिंदी मातृ भाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ३५.९८ लाख झाली. ३९.३५ टक्के ही वाढ आहे. कुटुंब विस्तार आणि मुंबईत वाढलेल्या जागांच्या किंमतीमुळे मूळ मराठी भाषिक मुंबईकर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वास्तव्याला गेला. पण तिथेही हिंदी भाषिकांची संख्या झपाटयाने वाढली. ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषिकांची संख्या ८०.४५ टक्के तर रायगड जिल्ह्यात ८७ टक्के आहे.

First Published on February 11, 2019 10:20 am

Web Title: in mumbai marathi speaking declineing hindi speaking percentage increasing
Just Now!
X