News Flash

प्रयोगांद्वारे विज्ञानातील गमतीजमती उलगडत बालविज्ञान संमेलनाचे उद्घाटन

भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शास्त्रज्ञ होण्याची क्षमता आहे. त्याला थोडेसे प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे.

(संग्रहित छायाचित्र)

हवेच्या दाबाचा चेंडूवर होणारा परिणाम, चुंबकाचे नियम, न्यूटनचे प्रयोग, प्रकाशाचे होणारे परावर्तन आदी विज्ञानातील गमतीजमती प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडत नवव्या बालविज्ञान संमेलनाचे उद्घाटन प्रा. भगवान चक्रदेव यांनी केले. मराठी विज्ञान परिषद आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांच्यावतीने या दोन दिवसाच्या (१६-१७ नोव्हेबर) राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या अध्यक्षीय भाषणाला दूर सारत चक्रदेव यांनी विज्ञानातील प्रयोगांचेच सादरीकरण यावेळी केले.

विज्ञानातील विविध नियम सोप्या पद्धतीत विद्यार्थ्यांना समजावून सांगताना गुरुत्व मध्य, न्यूटनचा झोपाळा, पाण्यातून प्रकाशाचे परावर्तन झाल्यावर त्याची बदलणारी दिशा, विद्युत दिव्यांच्या विविध गमतीजमती आदी प्रयोगांतून स्पष्ट करत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्यातील विज्ञानाची गोडी वाढविली. यावेळी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. के. सुब्रम्हण्यम आणि मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी उपस्थित होते.

वैज्ञानिक संशोधनासाठी संयम, मानवता, सातत्य आणि प्रसन्न मन हे शास्त्रज्ञाकडे असणारे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मसात केले पाहिजेत, असे मत मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. जोशी यांनी व्यक्त केले. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाचे प्रश्न काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शास्त्रज्ञ होण्याची क्षमता आहे. त्याला थोडेसे प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे.

वैज्ञानिक होण्यासाठी तुम्ही मोठय़ा घरातून यावे हे गरजेचे नाही. मायकेल फॅरेडे सारखा वैज्ञानिक सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला होता. आठवीत शाळा सोडल्यावर सुरवातीला त्याने पुस्तकांच्या बायडिंगचे काम केले. मात्र त्याच्या संशोधक वृत्तीने पुढे त्याने महत्त्वपूर्ण शोध लावले, असे जोशी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रज्ञा मोरे या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने ‘स्पिरूलीना शेवाळ’ या राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत विजेते ठरलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. या शेवाळच्या भुकटीचा वापर करून शरीरातील हिमोग्लोबीनच्या प्रमाणात वाढ करता येणे, शक्य असल्याचे तिने दाखवून दिले. या शेवाळात लोह आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्याची भुकटी चॉकलेटमध्ये मिसळून दररोज सेवन केल्यास महिन्याभरात शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते, हे तिने सप्रमाण सिद्ध करून दाखविले. तिच्या या प्रकल्पाला चीन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे.

संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे २०० च्या आसपास विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये गाजर गवतापासून जैविक खत निर्मिती, पिकांवरील खत फवारणीचा शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना, स्मार्ट हेल्मेटचा वापर करत सोलर मोबाइल चार्जर, भीषण दुष्काळ आणि त्याचे परिणाम, दैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्र अशा नानाविध गोष्टींवर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आकर्षक कल्पना सादर केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:19 am

Web Title: inauguration of a science related pediatric science experiment through experiments abn 97
Next Stories
1 फुलपाखरांच्या मराठी नावाचे पहिले पुस्तक
2 भाजपची सत्ता येणार हा फडणवीसांचा शब्द
3 शिवसेनेचा असहकार व पवारांबद्दलच्या सहानुभूतीचा फटका!
Just Now!
X