गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली असून धारावीमधील कामगार वर्ग मोठय़ा संख्येने कामानिमित्त मुंबईतील अन्य परिसरांत जात आहे. ही बाब लक्षात घेऊन धारावीसह अन्य भागांत मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करण्याचा निर्णय घेतला असून शनिवारपासून सोमवापर्यंत चाचण्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

टाळेबंदीच्या काळात धारावीमधील परप्रांतीय कामगारांनी परराज्यातील गावची वाट धरली होती. यापैकी बहुतांश कामगार पुन्हा धारावीत दाखल झाले आहेत. ही मंडळी दररोज कामानिमित्त मुंबईच्या अन्य भागांत जात-येत असतात. त्याचबरोबर बाजारपेठांमुळे दादर परिसरात गर्दी होत आहे. माहीममधील काही भागही गजबजून जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने धारावीसह दादर, माहीम भागात पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर मोबाइल चाचणी शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

१३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी ११ ठिकाणी, १४ फेब्रुवारी रोजी दोन ठिकाणी, तर १५ फेब्रुवारी रोजी एका ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

चाचण्यांच्या माध्यमातून करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे वेळीच रुग्णाला विलगीकरणात ठेवून संसर्गावर नियंत्रण मिळविता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’