पूल देखरेखीसाठी स्वतंत्र प्राधिकरण

मुंबई महापालिकेला उशिरा शहाणपण;३७४ पुलांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकालगतचा हिमालय पुलाचा भाग कोसळल्यानंतर जाग्या झालेल्या मुंबई महापालिकेने आता शहरातील पुलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिनाभरात या प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून त्यावर ३७४ पुलांची देखभाल, दुरुस्ती याची जबाबदारी असेल.

दादाभाई नौरोजी मार्गावरील बी. टी. लेन येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जाणारा पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ७.२०च्या सुमारास कोसळला आणि त्यात सहा जण ठार आणि ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशांनुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांमध्ये प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना दिले होते. दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आयुक्तांकडे सादर केला.

मुंबईमध्ये ३७४ पूल असून या पुलांसाठी पालिकेच्या अखत्यारीत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे आणि या प्राधिकरणावर प्रमुख पूल निरीक्षकांची नियुक्ती करावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. तातडीने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून एक महिन्यामध्ये या प्राधिकरणाची स्थापना करावी, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील सर्वच पुलांची तपासणी करावी. कोणत्या पुलाची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे, किती वेळेमध्ये पुलांची पाहणी करण्याची गरज आहे, पाहणीचा प्रमाणित अहवाल तयार करावा, पूल विभागातील अभियंत्यांची जबाबदारी काय आहे, धोकादायक पुलासाठी तात्काळ कोणत्या उपाययोजना कराव्या आदी कामाची जबाबदारी या प्राधिकरणावर सोपविण्यात येणार आहे. या अहवालातील शिफारशीनुसार एक महिन्याच्या आत पुलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबतचा आराखडा तयार करावा, असे आदेश अजोय मेहता यांनी पालिकेच्या संचालकांना (अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्प) दिले.